आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची दुसरी पिढीही दुष्टचक्रात

चार वर्षे दुष्काळाची गेली. आता पाऊसपाणी चांगले झाले होते. तेव्हा अतुल डम्बरेने आठ एकरांत कापूस लावला. बीड जिल्ह्य़ातील चौसाळा गावापासून १२ किलोमीटरवर राहणारा अतुल. त्याच्या वडिलांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. त्या दु:खातून त्याने आता कुठे उभारी धरली होती. या वेळी पावसाने साथ दिल्याने त्याच्या डोळ्यांत बरकतीची स्वप्ने दिसत होती. पिकाला बहार आला होता. कापूस चांगला येईल असे दिसत होते, पण अतिवृष्टी झाली आणि कापूस पुरता भिजला. दुष्काळात तेरावा महिना तशी संकटात निश्चलनीकरणाची भर पडली. कसाबसा हाती आलेला आठ क्विंटल कापूस घेऊन बाजारात गेलेल्या अतुलला पंतप्रधानांच्या या देशाला विकासाकडे नेणाऱ्या योजनेने आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे याची कल्पनाही नव्हती..

२९ नोव्हेंबरला तो बाजारात कापूस घेऊन गेला तेव्हा त्याला समजले, की तेथे नव्या नोटा हव्या असतील तर कापसाचा दर होता चार हजार रुपये आणि जुन्या ‘कागज का तुकडा’ झालेल्या ५००, हजाराच्या नोटा घेणार असू तर दर होता पाच हजार १०० रुपये. पण या जुन्या नोटा घेऊन करणार काय? त्याने अकराशे रुपये कमी तर कमी असे म्हणत नव्या नोटा घेतल्या. आता बाजारात हा फरक ९०० रुपयांवर आला आहे. परंतु असे नुकसान सहन करीत अतुल शेती करतो आहे. नव्याने दुष्टचक्रात अडकतो आहे.  नांदुरघाट या महसुली केंद्रात अलीकडच्या काळात १६ आत्महत्या झाल्या. मराठवाडय़ात २००१ पासून शासनाने ‘पात्र’ ठरविलेल्या २९६४ आत्महत्यांमध्ये अतुलचे वडील कैलास यांचाही समावेश आहे. त्यांना आठ एकर शेती. घरात खाणारी तोंडे दहा. घर पत्र्याचे. आत अंधार पसरलेला. तेथेच घोंगडीवर बसलेला अतुल सांगत होता, ‘शेतीत पिकले तरी कधीच पुरवणी पडले नाही. कर्ज झाले साडेतीन लाख. पुढे सावकारांकडून काही रक्कम घेतली. गावात वडिलांना चांगला माणूस म्हणायचे. अनेकांच्या मदतीला धावून जात असत. त्यांना वाटले, हे कर्ज काही लवकर फेडता येणार नाही. त्याचा घोर त्यांना लागला होता. अखेर त्यांनी आडूला गळफास लावून आत्महत्या केली.’ शेतकऱ्यांचे हाल नेत्यांना कळावे म्हणून कैलास डम्बरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष आल्याशिवाय अंत्यसंस्कार करू नयेत, असे लिहिले होते. काही नेतेमंडळी त्यांच्या अंत्यसंस्कारालाही नंतर आली.

वडिलांच्या मृत्यूनंतर तीन वष्रे पुन्हा लग्न करता येणार नाही, असे वाटून सगळ्यांनी अतुलचा विवाह केला. त्याने स्वत:ला शेतीत गुंतवून घेतले. आठ एकरांत कापूस लावला. त्यासाठी त्याला चुलत्यांनी मदत केली. पण कापूस आला आणि अतिवृष्टीत वाहून गेला. जो उरला त्यातही नोटाबंदीने नुकसानच झाले. नोटाबंदीनंतर कापूस वेचणीचे पैसे अतुलला देणे अजून बाकी आहे. प्रतिक्विंटल ९०० ते ११००चा फटका सहन करून तो शेती करतो आहे. येथील अनेक शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. कापूस दरफेऱ्याच्या दुष्टचक्रात ते पुन्हा अडकले आहेत.

मधल्या काळात शिवसेनेकडून अतुलला एक रिक्षा मिळाली. वडिलांच्या मृत्यूनंतर आठ एकर जमिनीचा मालक आता रिक्षाचालक झाला आहे. बाजाराच्या दिवशी पालसिंगणमधून तो प्रवासी घेऊन जातो. शेतीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा तेवढा एकच मार्ग त्याच्यासमोर आहे.

Story img Loader