छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील पाणवडोद गावाजवळ दुर्मिळ ‘स्वर्गीय नर्तक’ (इंडियन पॅराडाईस फ्लाय कॅचर) हा पक्षी आढळून आला. स्वर्गीय नर्तकने सिल्लोड परिसरात तीन दिवस मुक्काम केल्याची नोंद प्रथमच स्थानिक लोक जैवविविधता नोंद वहीत करण्यात आली. या पक्ष्याची माहिती ‘झुलाॅजिकल सोसायटी ऑफ इंडिया’च्या पोर्टलवरही करण्यात आली.
सिल्लोड येथील वन्यजीव संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले की, पाणवडोद येथील रहिवाशी व जळकी शाळेचे शिक्षक राधाकृष्ण सिनकर यांच्या शेताजवळ आंबा, कडुलिंब, सीताफळं आदींची दाट व मोठी झाडे आहेत. त्यावर त्यांना हा नवीन पक्षी दिसला. खूप मोठी लांबच लांब शेपूट, पांढरा शुभ्र रंग. नर पक्षाची शेपटी एक फूट लांब असते व दोन भागात विभागली असते. तर मादी तपकिरी रंगाची असते. डोक्यावर चमकदार काळा तुरा व डोके ही काळेशार असतात. चोच व पाय नीळसर राखाडी रंगाची आहे. सुंदर नर्तन करतो म्हणून स्वर्गीय नर्तक, असे त्याचे नाव आहे. मार्च ते जुलै हा यांचा विनीचा हंगाम असतो. हा मध्य प्रदेशचा राज्य पक्षी आहे.
स्वर्गीय नर्तकचा अधिवास हा उष्ण ते दमट भू -भाग प्रदेशात. दाट झाडे, झूडपे, शेतातील झाडे, शहरी उद्याने. ज्या झाडांखाली डास, कीटक अधिक तिथे अधिवासास प्राधान्य देतो. अधिकाधिक वेळ झाडांवर असून कीटक पकडण्यासाठीची अत्यंत चंचलता त्याच्याकडे असते.
स्वर्गीय नर्तकचे शास्त्रीय नाव टर्पीसिफान पॅराडीसी असून, त्याचे जीवनमान ५ ते ८ वर्ष असते. विणीच्या काळात कीटकभक्षी व उर्वरित हंगामात मिश्रहार घेतो. नर पक्षी हवेतच कीटक- डास, फुलपाखरे, नागतोडे, भुंगे, चतुर आदी कीटक खाऊन गुजरान करतो. हा मूळचा कर्नाटकच्या पश्चिम घाटात स्थानिक भारतीय पक्षी असून तो आपल्याकडे स्थलांतरीत झाला आहे व इकडेच रुळला आहे. – डॉ. संतोष पाटील, सिल्लोड