भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार रावसाहेब दानवे यांची फेरनिवड झाल्यानंतर जिल्हय़ातील दोन नवनेत्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांची पक्ष कार्यालयात भेट घेऊन अभीष्टचिंतन केले. या भेटीनिमित्ताने समोर आलेल्या काही बाबींविषयी येथील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष निवडीच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर व नवे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे हे दोघे अधिकृत निमंत्रित होते; पण या निमित्ताने मुख्यमंत्री व अन्य नेत्यांची भेट होते, हे लक्षात घेऊन बरेच जण मुंबईला गेले. त्यातील काही आता परतले आहेत. दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सलग दोन दिवस पक्ष कार्यालयात प्रचंड गर्दी झाली. वेगवेगळय़ा भागातील कार्यकर्ते हार-पुष्पगुच्छासह दानवेंना भेटत होते. गर्दीमुळे दानवे यांना प्रत्येकाशी बोलता आले नाही, तरी अध्यक्षपद हुकलेले श्रावण पाटील भिलवंडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर ‘काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ अशा शब्दांत दानवेंनी आश्वस्त केले. पुढच्या टप्प्यात महामंडळ व समित्यांवरील नियुक्तांचा विषय पक्षनेतृत्वाला निकाली काढावा लागणार असून, त्या वेळी भिलवंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
दानवे यांची नवी कार्यकारिणी पुढच्या महिन्यात जाहीर होईल. आधीच्या कार्यकारिणीत त्यांनी भास्करराव खतगावकर यांना उपाध्यक्षपद बहाल केले; पण नायगाव व हिमायतनगर नगरपंचायतींच्या निवडणुकीत त्यांना प्रभाव पाडता आला नाही. भाऊराव चव्हाण कारखाना निवडणुकीतही अशोक चव्हाण गटाने सर्वाचे पानिपत केले.
काँग्रेस व अन्य पक्षांतून रथी-महारथी भाजपत आले, तरी त्यांच्यामुळे जिल्हय़ात भाजपची शक्ती तसूभरही वाढली नाही. या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत जिल्हय़ास प्रतिनिधित्व देताना नवनेत्यांना प्राधान्य नको, असाच सूर जुन्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून निघाला. याचा अंदाज घेत डॉ. संतुक हंबर्डे यांनी दानवेंकडे डॉ. धनाजीराव देशमुख यांच्या नावाची शिफारस पहिल्या भेटीतच करून टाकली.
दुसरे ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर यशवंत जोशी हे जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते. रातोळीकर यांना संधी मिळणार नसेल तर जोशी अशी त्या वेळची मांडणी होती, पण लातूरच्या बैठकीत जोशी यांनी आपली प्रदेश कार्यकारिणीत काम करण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले होते. रातोळीकरांकडून त्यांच्याच नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे. वरील दोन संदर्भ लक्षात घेता, आधीच्या प्रदेश उपाध्यक्षांना स्पर्धक तयार होत असल्याचे संकेत पक्षातून मिळत आहेत. आपले पद कायम राखण्यासाठी खतगावकरांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा