छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड वळण रस्ता भागातील सातारा परिसरात व सिडकोतील प्रतिष्ठित भागात अनुक्रमे विदेशी व परप्रांतीय तरुणींकडून देहविक्री व्यवसाय करवून घेण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणाशी धागेदोरे असलेल्या आंतरराष्ट्रीय एजंट माहेला कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडेला (वय ५५) हिला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन सिडको ठाण्यात शनिवारी रात्री हजर केले.
पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली. कल्याणी देशपांडे ही पाषाणमधील बाणेर परिसरातील बालाजी नगरातील रहिवासी असून तिच्याविरुध्द पिटा कलमांतर्गत पुण्यातील डेक्कन, कोथरूड, चतुःश्रृंगी, हवेली, मालवणी पोलीस ठाण्यात दहा गुन्हे नोंद असल्याचेही पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पैठण रोडवरील “वाल्मी”जवळ विचित्र अपघात; एक ठार, सात जखमी
शहरात १६ जानेवारी रोजी सातारा परिसरातील एका खासगी मालकीच्या बंगल्यात काही महिलांकडून देहविक्री व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा मारला. यामध्ये एक विदेशी तर दोन परप्रांतीय तरुणींचा सहभाग आढळून आला. पोलीस उपायुक्त नवनीत कंवट यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी तुषार राजपूत, प्रवीण बालाजी कुरकुटे, आदील प्रसाद, गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव, कुमार माथुर, अर्जुन भुवनेश्वर डांगे (झारखंड) या संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील तुषार राजपूत याच्यावर यापूर्वीही अनेकवेळा अशाच प्रकरणात गुन्हे दाखल असून, तुषार व कल्याणी देशपांडे यांचे व्यवसायिक संबंध असल्याच्या माहितीवरून कल्याणीला ताब्यात घेतले आहे. साताऱ्यातील कारवाई झाली त्याच्या दोनच दिवसांपूर्वी सिडको एन-७ परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका शिकवणी वर्गाच्या खालच्या भागात महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करवून घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला होता. यामध्ये मुख्य आरोपी संदीप माहेन पवार, घरमालक सुनील रामचंद्र तांबट या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. संदीप पवार याला १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पीडित महिला या गुजरातच्या असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाच्या तपासातूनच सातारा परिसरातही देह विक्रीचा व्यवसाय करवून घेण्यात येत असल्याचे समोर आले होते.