छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणपूरक वाहननिर्मितीच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक फक्त ऑरिक या औद्योगिक वसाहतीमध्ये झाली. जपानच्या ‘ह्योसंग’पासून ते ‘जेएसडब्ल्यू’ आणि ‘एथर’पर्यंत बहुतांश बड्या कंपन्यांनी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले. या गुंतवणुकीला शैक्षणिक गुणवत्तावाढीची साथ मिळत आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयातूनही उद्योगपूरक अभ्यासक्रम शिकविण्यापर्यंतचे बदल होऊ लागले आहेत. प्राथमिक शाळांमध्येही बदल होऊ लागले आहेत. ते भाषिक आणि गणितीय या दोन्ही अंगाने आहेत. जिल्ह्यातील काही शाळांमध्ये जपानी भाषेतूनही ऑनलाइन शिक्षण दिले जाते. गुंतवणुकीला गुणवत्तेचा आधार नसेल तर नोकऱ्या जातील, हे भान देण्यात यश मिळत असल्याचा दावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी करतात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सेवा क्षेत्रातही लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. दरडोई उत्पन्नात २०२२ – २३ मध्ये १५.८१ टक्क्यांची वाढ दिसून आली. पूर्वी दरडोई उत्पन्न दोन लाख सात हजार ५७४ एवढे होते. आता ते दोन लाख ३८ हजार ५३६ एवढे झाले आहे. शालेय शिक्षणात जिल्ह्याला पुढे आणण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन मुख्याध्यापकांच्या बैठका घेतल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले. आता भागाकार करता येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. भाषा आणि गणित या दोन्ही विषयांमध्ये वाढ करता यावी, असे प्रयोग हाती घेण्यात आले. कौशल्यपूर्ण आणि आनंददायी अभ्यासक्रमातही छत्रपती संभाजीनगर जिल्हा अग्रेसर असल्याचा दावा अधिकारी करतात.

जपानी भाषेचे शिक्षण

जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन जपानी भाषेचे शिक्षण देणारी एक शाळा आहे. गाडीवाट असे त्या गावाचे नाव. जिल्हा परिषदेतील या शाळेतील उपक्रम अनेक शाळांमध्ये आता केले जात आहेत.

प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकायचे असेल तर शालेय गुणवत्तेकडे लक्ष द्यायला हवे, असे आम्ही ठरवले होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या सहकार्याने शाळेच्या पातळीवर एक दशसूत्री कार्यक्रम ठरवून देण्यात आला. गुणवत्तेच्या अनुषंगाने उपस्थित होणारे प्रश्नही अगदी तालुका पातळीवर मुख्याध्यापकांसमोर मांडले.

मुख्याध्यापकांना प्रोत्साहन दिल्यानंतर शालेय पातळीवर नवीन उपक्रम राबविण्यासाठीही प्रयत्न केले. जिल्ह्यात गुंतवणूक वाढत असताना आणि रोजगाराच्या संधी वाढत असताना गुणवत्ता टिकवणे ही गरज होती. त्यात आता एक पाऊल पुढे पडत आहे. त्याचा आनंद आहे. -दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

वाहनांच्या संख्येत वाढ

उत्पन्न वाढल्याने जिल्ह्यातील दुचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत १७ लाख ४२ हजार ४०७ वाहने असून, त्यातील १३ लाख ६४ हजार ७५८ वाहने दुचाकी आहेत. हे प्रमाण ७८.३२ टक्के एवढे आहे.