घातपाताच्या संशयावरून पकडलेल्यांची संख्या दहा; सर्व आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्यात रसायन मिसळून घातपात करण्याचा डाव आखत असल्याच्या व आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून आणखी एकास मुंब्रा येथून शनिवारी अटक करण्यात आली. रविवारी दहशतवादी विरोधी पथकाच्या विशेष न्यायालयासमोर त्याला हजर केले असता ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. यापूर्वी औरंगाबाद व मुंब्रा येथील मिळून नऊ जणांना अटक केली असून, त्यापैकी एक अल्पवयीन आहे. त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी मुंब्रा येथील दोस्ती प्लॅनेट नॉर्थ भागातील शिल्ड टायगरजवळील इमराल्ड टॉवर येथे राहणारा तलहा उर्फ अबुबकर हनीफ पोतरिक (वय २४) याला अटक केली आहे. तलहा हा यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एक असलेल्या सलमान खान याच्या घातपात घडवून आणण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीस उपस्थित असल्याच्या संशयावरून त्याला अटक केली.
यापूर्वी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने ठाणे जिल्हय़ातील मुंब्रा व औरंगाबादेत राहात असलेले मोहसीन सिराजोद्दीन, एक सतरावर्षीय अल्पवयीन मुलगा, मजहर अ. रशिद शेख, मो. तकी उर्फ अबु खालिद सिराजउद्दीन खान (२०), मो. मुशाहिद उल इस्लाम, मो. सर्फराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी, जम्मन नवाब खुटेउपड, सलमान सिराजउद्दीन, फहाज सिराजउद्दीन यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्याकडून १० हार्डडिस्क, उंदीर मारायचे औषध, ३०च्या वर सिम कार्ड, बॅटरी, थिनरसारखा वास येणारे रसायन, व्हिनेगरसारखा वास येणारे रसायन, सेल आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर काला चौकी मुंबई येथे गुन्हा दाखल करून औरंगाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.
शनिवारी पकडलेला तलहा उर्फ बकरला अटक करून रविवारी औरंगाबाद येथील विशेष दहशतवादी विरोधी पथकाच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, अतिरिक्त सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी, घातपाताच्या कटाशी संबंधित अधिकच्या माहितीसाठी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. यावर अबू बकरचे वकील खिजर पटेल यांनी बाकी आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तलहालाही ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी देण्याची विनंती केली असता न्यायालयाने ती मान्य केली.
बैठकीसाठी ग्रुप
घातपाताची तयारी आणि घातपातात लागणाऱ्या साहित्य मिळवण्यासाठी या सर्वानी मिळून एक ग्रुप तयार केला होता. ‘उम्मत ए मोहम्मदिया’ असे ग्रुपचे नाव ठेवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या ग्रुपच्या सर्व बठकीत तलहा उर्फ अबुबकर उपस्थित असायचा. त्याच्याकडून एक लॅपटॉप, एक टॅब आणि मोबाइल तसेच सिम कार्ड्स दहशतवादी विरोधी पथकाने जप्त केले असून, अजून रसायन आणि कटाची माहिती काढण्यासाठी अबुबकरला कोठडीची मिळाली आहे.