छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणामध्ये तरंगत्या सौर पटलाच्या आधारे १ हजार ९४२ मेगावॉट वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पामुळे जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयावरील ११ टक्के हिस्सा सौर पटलाने झाकला जाणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्यकिरणे पाण्यावर न पडल्याने जैवविविधतेवर काही परिणाम होईल का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकल्पावर आक्षेप घेणाऱ्या याचिका यापूर्वी फेटाळल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प होईलच, असा दावा खासदार डॉ. भागवत कराड यांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात तरंगत्या सौर पटलाच्या आधारे वीजनिर्मिती करणाऱ्या या प्रकल्पास अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी विरोध केला होता. शरद पवार यांनीही या प्रकल्पामुळे जैवविविधतेवर परिणाम होईल, असे म्हटल्याचे लंके यांनी माध्यमांना सांगितले होते. जायकवाडी हे पक्षी अभयारण्य असल्याने येथे हा प्रकल्प सुरू करण्याबाबत शंका घेतल्या जात होत्या. पक्ष्यांच्या अधिवासावर व विहारावर या प्रकल्पाचा परिणाम होईल, असा आक्षेप घेतला जात होता. पैठण भागातील कहार समाजाच्या वतीने मासे कमी होतील, त्यामुळे जगण्याचे नवे प्रश्न निर्माण होतील, असे निवेदन देण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाचा आराखडा आता तयार असून, तो व्हावा यासाठी प्रयत्न करू, असे डॉ. कराड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या प्रकल्पातील सौर पटलामुळे जायकवाडी धरणातून होणारे २८ टक्के बाष्पीभवन कमी होणार आहे. तेवढे पाणी दुष्काळी मराठवाड्यास अधिकचे मिळू शकतो, असा युक्तिवादही केला जात आहे.

जायकवाडी धरणातील जलाशयाचा आकार ३३ हजार ९८९ हेक्टर एवढा असू शकतो. त्यातील चार हजार २०५ हेक्टरवर हा सौर प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे जैवविविधतेवर काय आणि कसा परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी म्हैसकर यांच्यासमवेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री संस्थेचे सदस्य, तसेच डेहराडून येथील वन्यजीव संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे.

Story img Loader