जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय पोलीस संरक्षणाअभावी शनिवारी अमलात आला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक च. आ. बिराजदार यांनी शुक्रवारी रात्री १० वाजता दिले. तथापि नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व पोलीस अधीक्षक संजय मोहिते परदेश दौऱ्यावर असल्याने या कारवाईस पुरेसा बंदोबस्त मिळणे कठीण गेले. परिणामी जलसंपदा विभाग सहसचिव व्ही. एम. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून वीज तोडणी व पोलीस संरक्षणाची बाब मुख्य सचिवांच्या कानावर घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, या साठी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कार्यकारी संचालकांची भेट घेतली. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाही संरक्षणाची अडचण असल्याचे, तसेच पोलीस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत पाणी सोडणे अवघड असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी दिवसभर या अनुषंगाने कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे मराठवाडय़ात आंदोलने तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दबाव वाढविण्यात आला होता.
पथकांना पाणी सोडण्याबाबत दिवसभर सूचना दिल्या जात होत्या. तथापि जलसंपदा मंत्र्यांसह नाशिकमधील सर्व अधिकारी परदेशी असल्याने शनिवारचा दिवस पाणी सोडता आले नाही. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी आता पाणी सोडण्याचा चेंडू मुख्य सचिवांच्या कानापर्यंत नेला. तथापि सायंकाळपर्यंत कारवाई झाली नव्हती.

Story img Loader