जोगेंद्र कवाडे यांचा सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रात:स्मरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आदराने करता, मग त्यांचा जातीअंताचा लढा पुढे का घेऊन जात नाही, असा सवाल पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फूस असल्यानेच साध्वी प्राची यांनी मुस्लीममुक्त भारत असे वक्तव्य केले. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी, या मागणीसाठी पक्षाच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनावर २७ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे कवाडे म्हणाले.
सनातन संस्था ही हिंदुत्ववादी नाही, ती ब्राह्मणवाद जोपासते. त्यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या केल्या आहेत. या संस्थेवर कारवाई व्हावीच. मात्र, त्यांना आता भीमसैनिकही त्यांच्याच पद्धतीने उत्तरे देतील, असेही कवाडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर टीका करत ते म्हणाले की, बहुसंख्येने असणाऱ्या हिंदूना देशात कोणतीही भीती नसताना त्यांना लाठय़ा-काठय़ा व बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हीच भाषा जेव्हा आम्ही वापरली तेव्हा मोठा गहजब करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळ दिल्यामुळेच मुस्लीम मुक्त भारत अशा घोषणा दिल्या जातात. साध्वी प्राचींविरोधी कारवाई करण्याच्या मागणीसाठी तसेच देशाच्या एकात्मतेला तडा घालणाऱ्या सनातन संस्थेच्या साधकांवर देशद्रोही कृत्य केल्याचा आरोप ठेवून कारवाई व्हावी, या मागणीसाठी २७ जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे कवाडे म्हणाले.

Story img Loader