दोन वर्षांनंतर पावसाने वार्षकि सरासरीची सत्तरी ओलांडली आहे. नद्या-नाले खळखळून वाहू लागले असून पाटोदा तालुक्यातील सौताडा आणि बीड तालुक्यातील कपिलधार येथील धबधबा पर्यटकांना आकर्षति करू लागला आहे. आठवडाभरापासून या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड जिल्ह्यात दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. पिण्याच्या पाण्याची टंचाईदेखील मोठय़ा प्रमाणात जाणवत असल्याने परिसरातील विहिरी धुंडाळण्याची वेळ लोकांवर आली होती. नदी-नाले, तलावदेखील कोरडेठाक पडल्यामुळे खळखळणारे पाणी कोठेच पहायला मिळत नव्हते. यंदा मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. मध्यंतरी पाऊस गायब झाला होता, मात्र परतीच्या मार्गावर असताना त्याने मोठा दिलासा दिला. वार्षकि सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाल्याने नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. अनेक प्रकल्प तुडुंब भरले आहेत. सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव पूर्णपणे भरला असून तेथील धबधबा वाहू लागला आहे.

राज्यात प्रसिद्ध असलेला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. हिरवळीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरातील हा धबधबा सर्वाच्याच आकर्षणाचा केंद्रिबदू ठरू लागला आहे. कपिलधार येथेही धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मन्मथ स्वामींचे समाधीस्थळ असलेल्या कपिलधारची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यात देखील आहे.

 

नळदुर्ग किल्ल्यातील धबधबा सुरू

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग किल्ल्यावरील धबधबा कोसळू लागला आहे. सतत तीन वष्रे दुष्काळाने मुक्काम ठोकल्यामुळे हा नर-मादी धबधबा वाहू शकला नव्हता. मागील आठवडय़ात परतीच्या पावसामुळे तब्बल चार वर्षांनंतर हे दोन धबधबे सुरू झाल्याचे पर्यटकांना पाहावयास मिळणार आहेत.

पाण्याअभावी किल्ला परिसरात आटलेली बोरी नदी व वाळलेली झाडे असे विदारक चित्र यंदाच्या पावसाळय़ापर्यंत होते. यंदा चांगला पाऊस झाल्याने किल्ला परिसरात हिरवळ वाढली असून बोरी नदीला पाणी आले आहे. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील खालच्या बाजूस असलेला मादी धबधबा सुरू झाला आहे. हळूहळू नदीतील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे काही दिवसांत नर धबधबाही सुरू होईल, असे चित्र आहे. मंगळवारपासून मादी धबधबा सुरू झाला आणि हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक नळदुर्गच्या किल्ल्यात दाखल झाले होते.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapildhara waterfall beautiful indian tourist spots