बिपीन देशपांडे
छत्रपती संभाजीनगर : यंदा केसर आंब्याला ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच मोहर लागायला सुरुवात झाली आहे. अभ्यासकांच्या मते हे प्रथमच घडले असून, सुमारे दीड महिना आधीच मोहर फुटल्याने केसरचा आंबा हापूससोबतच फेब्रुवारीमध्ये बाजारात दाखल होऊ शकतो. ऑक्टोबरमध्ये मोहर लागण्याला या वर्षी जुलै-ऑगस्टच्यादरम्यान पावसाचा महिनाभरापर्यंत खंड पडलेल्या वातावरणाचे परिणाम मानले जात आहे.
केसर आंब्याला कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात नियमित मोहर येण्याचा कालावधी म्हणजे डिसेंबर, जानेवारी हा असतो. केसर आंबा १५-२० मे महिन्याच्या दरम्यान, काढायला सुरुवात होते. त्याचा हंगाम १५-२० जूनपर्यंत चालतो. मात्र आता जे नवीन कल्टार (वाढनिरोधक) देण्याचे तंत्र विकसित झाले आहे त्यानुसार जुलैअखेरीस किंवा ऑगस्टमध्ये केसर आंब्यास नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ात हमखास मोहर येतो आणि याची फळे मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच काढणे सुरू होते.
हेही वाचा >>> उत्सवातील ध्वनी, प्रकाश किरणाची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टरांचे मंथन
या वर्षी मात्र निसर्गाचा फेरा किंवा वातावरणातील बदलामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात केसर आंब्याला ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच बऱ्याच ठिकाणी मोहर फुटलेला आहे. अनेक बागांना केसरच्या झाडावर डोळे फुगलेले आहेत. त्यातूनही मोहर येतो की नवती (पालवी) हे सध्याच सांगणे कठीण असल्याचे महा केसर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवान कापसे यांनी सांगितले.
या वर्षी एक ते दीड महिना लवकर मोहर येण्यामागे पावसाच्या प्रमाणात पडलेला खंड कारणीभूत आहे. निफाड तालुक्यातील रानवडगावचे संदीप जाधव, पंढरपूरजवळील सागर गावधरे, धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीजवळील पार्डीचे विठ्ठल चौधरी यांच्या केसरच्या बागेतील झाडांना मोहर फुटलेला असून, त्याचे प्रमाण सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंत दिसून येत असल्याची माहिती डॉ. कापसे यांनी दिली.
काय होणार ?
केसरला ऑक्टोबरमध्ये मोहर फुटल्याने आंबा फेब्रुवारीमध्येच बाजारात दाखल होऊ शकतो. म्हणजे हापूससोबतच केसरही बाजारात येत असल्याने दरही चांगला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. हापूसची पहिली पेटी १० ते १५ हजारांपर्यंत जाते. केसरलाही चांगला दर मिळू शकतो. पण त्यासाठी उत्पादकांनीही झाडांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे उत्पादकांकडून बोलले जात आहे.