छत्रपती संभाजीनगर : फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या वाणांपैकी हापूस आंब्याला वरचा दर्जा प्राप्त असला तरी, भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी ५१ टक्के निर्यात केशर आंब्याची होत असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. विशेष म्हणजे, भारत आंबा उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर असला तरी, आंबा निर्यात करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचा क्रमांक मागेच आहे.

अॅग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंटच्या (ऑपेडा) आंबा निर्यातीत पुढे असलेल्या देशांच्या माहितीनुसार क्रमांक १ वर मेक्सिको हा देश आहे. मेक्सिकोमधून आंब्याची १४.१ टक्के तर पेरू या देशातून १२.१ टक्के निर्यात होते. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर थायलंड व ब्राझील असून, या दोन्ही देशांतून समान म्हणजे ११.४ टक्के एवढी आंबा निर्यात होते.

भारतातून केवळ पाच टक्के निर्यात होते. त्यातही केशर आंब्याची निर्यात ही ५१ टक्के असल्याची माहिती महाकेशर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष तथा पणन मंडळाचे निवृत्त संचालक डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली.

भारतातून हापूस, बैगनपल्ली, हिमायत, चिन्ना रसालु, राजापुरी अशा प्रकारचे आंबे निर्यात होतात. मात्र, त्यात सर्वाधिक निर्यात केशर आंब्याची होते. यातील जवळपास ८८ टक्के माल गुजरातमधील असतो, तर महाराष्ट्रातील केशर १२ टक्के निर्यात होतो. हापूस आंबा केवळ १३ टक्के निर्यात होतो. केशरनंतर दुसऱ्या क्रमांकावर बैगनपल्ली आंबा असून तो ३२ टक्के निर्यात होतो.

महाराष्ट्रात कोकणवगळता उर्वरित सर्व भागात मिळून केशर आंब्याचे लागवड क्षेत्र ६५ हजार हेक्टर असल्याचे डॉ. कापसे यांनी सांगितले. यंदा ४५ ते ५० हजार मेट्रिक टन केशरची निर्यात होईल असा अंदाज असून कृषी विभागाकडे यंदा ९ हजार ४६९ आंबाबागांची नोंद झाल्याची माहिती आहे. केशर आंबा साधारण २५ मेपर्यंत बाजारपेठेत दाखल होईल, अशी माहिती पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

निर्यातीबाबत साशंकता?

●महाराष्ट्रातून दरवर्षी साधारणपणे २५ हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात केली जाते. ‘इंडियन मॅंगोज’ म्हणून हे आंबे निर्यात केले जातात. त्यामुळे त्यात हापूस, केशर, पायरी असे वर्गीकरण केले जात नाही.

●गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल २४ ते फेब्रुवारी २५ या कालावधीत १९ हजार ७६९ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली. अमेरिका आणि युरोपमध्ये आंबा निर्यातीवर दर्जा, आकार अशी बंधने आहेत.

●ठरावीक दर्जाचा आंबाच या ठिकाणी निर्यात केला जाऊ शकतो. तसे निर्बंध दुबई आणि आखाती देशात नाहीत. त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात भारतीय आंबा निर्यात केला जात असतो.

●खासगी व्यापाऱ्यांकडून ही निर्यात होत असते. त्यामुळे त्याची निर्यात नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे हापूस आंबा किती निर्यात झाला असे सांगता येणे शक्य नाही, अशी माहिती रत्नागिरी मार्केटिंग बोर्डाचे विभागीय महाव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी दिली.