आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत खो खो या खेळाचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर या भारतीय खेळाची माहिती घेण्यासाठी दक्षिण कोरियाहून आलेल्या पथकाने औरंगाबाद शहराला भेट दिली. महाराष्ट्र खो खो संघटनेच्या वतीने या दौऱ्याचे आयोजन केले असून पथकाने शहरातील माँटेसरी बालक मंदिर शिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित केलेल्या सामन्याचे बारकाईने निरीक्षण केले. धर्मवीर संभाजी विद्यालय व माँटेसरी बालक मंदिर यांच्या दरम्यान खेळवण्यात आलेल्या सामन्याचा आनंद पथकातील सदस्यांनी घेतला. जिल्हा खो खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा यांनी या खेळाचे नियम, तसेच हा खेळ कसा खेळला जातो, याची माहिती पथकातील सदस्यांना दिली. किचे जाँग, तोंहन बे, जे-हून किम, सू चँग किम यांचा या पथकात समावेश आहे. माँटेसरी बालक मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. म. ह. सावजी, मुख्याध्यापिका मी. रा. गोसावी, मुख्याध्यापक बाळासाहेब कुलकर्णी, खो खो संघटनेचे सचिव शर्मा, क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, दीपक सकपाळ, कैलास पटणे, अनिता पारगावकर, उदय पंडय़ा, उमाकांत शिराळे आदी या वेळी उपस्थित होते. पारंपरिक भारतीय पद्धतीने या परदेशी पाहुण्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. डी. एम. सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. कोरियाच्या पथकाने वैजापूर येथे जाऊन जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे निरीक्षण करून आनंद घेतला.

Story img Loader