येथील पहिल्यांदाच अवयवदान करण्याच्या प्रक्रियेनंतर अब्दुल गनी पटेल या ५५ वर्षांच्या गृहस्थास एका अर्थाने जीवदान मिळाले. धूत रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ५ वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या अब्दुल यांना जीवदान मिळाले.
बुलढाणा येथील देऊळगाव माळीच्या राम सुधाकर मगर या २५ वर्षीय युवकाच्या अपघातानंतर त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. शहरातील सिग्मा हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि प्रशासकीय यंत्रणेने हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मुंबई येथे एक किडनी आणि यकृत पाठविण्यात आले. दुसरी किडनी शहरातील नंदलाल धूत रुग्णालयाकडे देण्याचे ठरविण्यात आले.
तत्पूर्वी सलग चार-पाच वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असणारे शेतकरी अब्दुल गनी पटेल नियमित धूत रुग्णालयात येत असे. त्यांचे जीवन डायलिसीसवर अवलंबून होते. शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक विवंचनाही होत्या. मात्र, रामची किडनी मिळू शकते, अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर धूत रुग्णालयातील डॉक्टरांनी अब्दुल गनी पटेल यांना पुन्हा एकदा रुग्णालयात बोलावून घेतले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करता येऊ शकते का, याची तपासणी करण्यात आली. साडेतीन तास शस्त्रक्रिया केल्यानंतर किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. डॉ. विजय बोरगावकर यांनी प्रत्यारोपण प्रमुख म्हणून काम पाहिले, तर डॉ. रवींद्र भट्टू यांनीही मार्गदर्शन व सहकार्य केले. ही शस्त्रक्रिया करताना डॉ. देवदत्त पळणीटकर, डॉ. अभय महाजन, डॉ. वैशाली देशपांडे आदी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या पूर्वी ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण २००५ मध्येही या रुग्णालयात करण्यात आले.
अब्दुल पटेल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या होत्या. प्रत्यारोपणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक नव्हता. शेवटी तपासाअंती रामची किडनी अब्दुलला उपयोगी होऊ शकते, असे समजल्यानंतर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अब्दुल पटेल यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ. बोरगावकर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा