छत्रपती संभाजीनगर : विनोदवीर कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाणे तयार केले. त्याच्या या कृतीमुळे आम्ही सुखावलो असून, कामराच्या गाण्याला आमचे समर्थन आहे, अशी भूमिका एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवर माध्यमांसमोर बोलताना मांडली. ते शांतता समितीच्या बैठकीसाठी आले होते.
यावेळी इम्तियाज जलील म्हणाले, “एका भोंदू साधुने आमचे दैवत महंमद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द काढले तेव्हा त्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सत्कार करून पाठ थोपटली होती. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे शिंदे म्हणाले होते. आम्हाला दु:ख झाले तेव्हा तुम्ही आनंदोत्सव साजरा करता. आता एका विनोदवीराने एक छोटीसी टिपण्णी शिंदेंवर केली तर त्यांचे गुंड जाऊन त्याचे कार्यालय फोडतात. शिंदेंना दु:ख होते.”
इम्तियाज जलील यांनी नागपूरच्या दंगलीतील आरोपी फहीमखानच्या घरावर बुलडोजर चालवल्याच्या घटनेवरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बुलडोजर चालवण्याची कृती ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून, न्यायालयाने योगी सरकारच्या कृतीवरूनच यापूर्वीच आदेश दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्या चादरीवर कुराणाची आयते लिहिली आहेत त्या चादरीला जाळून तुडवले आहे. त्याच्या चित्रफितीही प्रसारित झाल्या आहेत. मात्र, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात असं काही झालं नाही. फडणवीस यांना चष्मा लावण्याची गरज आहे, असे सांगून नागपूर दंगलीच्या घटनेत एका बाजूनेच कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात लोकशाही राहिलेली नाही. गुंडशाही सुरू आहे. नव्या राजनीतीची सुरुवात महाराष्ट्रात सुरू झाली. त्या नीतीसोबत जगणे-लढत राहावे लागणार आहे, असे इम्तियाज जलील म्हणाले.