छत्रपती संभाजीनगर : ज्या हंगामात जे स्वस्त होते त्याचे लोणचे घालून त्याच्या विक्रीतून २० लाख रुपयांची उलाढाल करणाऱ्या संगमनेरमधील शोभना सोनवणे ‘लखपती दीदी’ आहेत. विविध प्रकारचे छोटे व्यवसाय करून ‘लखपती दीदी’चा मान मिळवणाऱ्या महिलांची संख्या सध्या १३ लाख सहा हजार आहे. भविष्यात देशातील अशा तीन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा संकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखानुदानात सोडला आहे.
हेही वाचा >>> मराठा सर्वेक्षण ९० टक्के पूर्ण; प्रशासनाचा दावा, आचारसंहितेपूर्वी अहवाल सरकारकडे?
बचत गटाच्या आधारे व्यवसाय करण्यात अनेक महिलांनी पुढाकार घेतला आहे. ‘लखपती दीदी’ बनण्यासाठी बचत गटांना दीड लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. शोभना सोनवणे यांच्या गटानेही साडेसात लाख रुपयांचे कर्ज घेतले. पुढे ते त्यांनी फेडले आणि आता सूक्ष्म खाद्य पदार्थ निर्मितीसाठीच्या कर्ज योजनेतून त्यांनी साडेदहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून ४० प्रकारची लोणची तयार करून त्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची आजची उलाढाल २० लाखांहून अधिक आहे. महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांवर भर देण्याचे सुतोवाच या वेळीही अर्थमंत्री सीतारामन यांनी दिला. गेल्या काही वर्षांत ‘मुद्रा’ योजनेच्या माध्यमातून तसेच अन्य योजनेतून महिला उद्योजकतेचे शेकडा प्रमाण २४ टक्क्यांनी वाढल्याचा दावा या क्षेत्रात काम करणाऱ्या भाजपच्या नेत्या विजया रहाटकर यांनी केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या कालिंदा जाधव यांनी दालबाटी आणि ढोकळयाचे पीठ तयार करण्याच्या व्यवसाय सुरू केला त्यास तीन वर्षे झाली. आता त्यांचा स्वत:ची नाममुद्रा (ब्रॅन्ड) आहे. समर्थ दालबाटी आटा आणि ढोकळा आटा विक्रीचा व्यवसाय त्या करतात. दररोज किमान दोन क्विंटल पीठ करून त्याचे पॅकेजिंग करण्याचा त्यांचा व्यवसाय आता बहरात आहे.
बाजारभाव कमी होते तेव्हा लिंबू, आंबा, मिरची, आवळा खरेदी करून त्यांचे लोणचे तयार करून त्याची विक्री आधी स्थानिक बाजारपेठेत केली. नंतर हे पदार्थ विविध प्रदर्शनांतून विकले. आता या पदार्थाना स्वत:चे नाव आणि ओळखही मिळाली आहे.
– शोभना सोनवणे, लखपती दीदी, संगमनेर
दालबाटीच्या आटयाची प्रतिदिन विक्री कधी १२ हजार रुपयांपर्यंत जाते, तर कधी ती निम्म्यावर येते. पण आता मॉलमध्येही हा आटा ठेवू लागलो आहोत. केवळ दालबाटचा आटाच नाही, तर ढोकळा पीठाची मागणीही अधिक आहे. शेतीत मजुरी करणारी अशी माझी पूर्वीची ओळख आता महिला उद्योजक अशी बदलली आहे.
– कालिंदा जाधव, लखपती दीदी, पैठण
लवकरच ‘ड्रोन दीदी’
* ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे काम ‘उमेद’च्या माध्यमातून स्वयंसाहायता गटांमार्फत केले जात आहे.
* या महिलांना महिला आर्थिक विकास मंडळाकडूनही व्यवसाय मार्गदर्शन केले जाते. आता शेतीतील फवारणीसाठी ‘ड्रोन’ प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
* अशा महिलांना ‘ड्रोन दीदी’ म्हटले जात आहे. अद्याप हे काम राज्यात सुरू झालेले नाही.