छत्रपती संभाजीनगर : केवळ जागा मिळाली नाही म्हणून रखडलेला ‘सी – डॉपलर रडार’ बसविण्याचा निर्णय आता अंमलबजावणीमध्ये येणार आहे. खुलताबाद जवळील म्हैसमाळच्या डोंगरावर रडार बसविण्यासाठी अर्धा एकर जागा देण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी अर्धा जागा लागणार होती. मात्र, जागा मंजुरीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविताना हेक्टरऐवजी आर असे एकक लिहिताना चुकले. ती चूक दुरुस्त करण्यासाठी वर्षभराचा वेळ गेला. आता जागा मिळाली असल्याने पुढील दीड वर्षात हे रडार बसेल, असा दावा खासदार डॉ. भागवत कराड यांनी केला.

‘सी -बॅण्ड डॉपलर रडार’ची तांत्रिक माहिती देताना हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे म्हणाले, ‘तीन प्रकारचे डॉपलर रडार असतात. ‘एक्स’ बॅण्ड डॉपलर रडार समुद्र किनारी बसविले जाते. या रडारची क्षमता जास्त असते. ५०० ते ६०० किलोमीटरपर्यंतची प्रत्येक हवामान बदलाची नोंद यात घेता येते. त्यामुळे चक्रीवादळाचे अंदाज बांधता येतात. एस बॅण्ड डॉपलर आणि सी बॅण्ड डॉपलर रडारची क्षमता कमी असते.

मराठवाड्यात बसविल्या जाणाऱ्या रडारची हवामान अंदाज टिपण्याची क्षमता ४०० किलोमीटरची असते. प्रत्येक दहा मिनिटांनी एकदा हे रडार नोंदी घेत असते. त्या आधारे पावसाचे ढग, त्यातील पाणी, गारांचा पाऊस या विषयीचे अंदाज बांधता येतील.’ बसविण्यात येणाऱ्या डॉपलर रडारची किंमत १५ ते २० कोटी रुपयांपर्यंत असू शकते. त्याच्या जागतिक स्तरावरील निविदा प्रकाशित होतील. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास आणखी दीड वर्षे लागू शकेल असे सांगण्यात आले. ‘सी-डॉपलर रडार’ मराठवाड्यात असावे अशी मागणी डॉ. भागवत कराड यांनी केली हाेती. गेली तीन वर्षे त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जागेचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.