स्मार्ट सिटीमधील महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड प्रकल्प नक्की कोणत्या ठिकाणी घ्यायचा, याचा निर्णय येत्या २ दिवसांत होणार असून ५ डिसेंबपर्यंत या बाबत नगरविकास विभागाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. नक्षत्रवाडी, कांचनवाडी येथे ग्रीनफिल्डसाठी जागा निश्चित केली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी चिकलठाणा येथील केंद्रीय शाळेजवळ केंब्रिजनजीक असलेली जागा ग्रीनफिल्डसाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असे नव्याने चर्चेत आहे. मात्र, कोणत्या जागेवर ग्रीनफिल्ड सिटी उभारली जाईल, हे अजून नक्की झाले नाही.
स्मार्ट सिटीचा आराखडा फोट्रेस नाइट फ्रँक या संस्थेने तयार केला असून नक्षत्रवाडी हाच त्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, हा प्रकल्प चिकलठाणा की नक्षत्रवाडी या बाबतचा निर्णय अजून झाला नाही. येत्या दोन दिवसांत जागा निश्चिती होईल, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत सांगण्यात आले. डीएमआयसी प्रकल्पामुळे चिकलठाणा येथे ग्रीनफिल्डचा पर्याय अधिक सक्षमपणे उभा राहू शकतो, असे सांगितले जात आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी या अनुषंगाने त्यांचे मत नोंदविले. चिकलठाणा भागात महापालिकेची स्वत:ची जागा असल्याने बहुतांश पदाधिकारी ग्रीनफिल्ड प्रकल्प या ठिकाणी व्हावा, या मतापर्यंत पोहोचले आहेत. कांचनवाडीचा पर्यायही खुला असल्याचे सांगितले जाते. तथापि, महापौर तुपे म्हणाले, की जागा निवडताना वादाची जागा घेऊ नका. ज्या ठिकाणी ‘सात-बाराचा वाद’ नाही, अशाच जागा निवडाव्यात.
स्मार्ट सिटीअंतर्गत पुनर्बाधणीसाठी नागरिकांमधून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. जुन्या इमारती पाडून नवीन इमारती उभ्या करणे असे पुनर्बाधणीतील उद्दिष्ट होते. मात्र, नागरिकांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. बिडकीन येथे औद्योगिक वसाहत निर्माण होणार असल्याने कांचनवाडीचाही पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. स्मार्ट सिटीत पाण्याच्या दोन लाइन, मलनि:स्सारणाची वेगळी व्यवस्था, सौरऊर्जा, स्वस्त किमतीतील घरे, ग्रीन झोन, बफर झोन, रस्ते, सायकल ट्रॅक व फुटपाथ यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती अभियंते सिकंदर अली यांनी बैठकीत दिली.
आराखडय़ात नक्षत्रवाडीवर भर देण्यात आला असला, तरी जागेची निश्चिती अजून झाली नाही. ती दोन दिवसांत होणार आहे. त्यानंतर ५ डिसेंबपर्यंत नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला जाईल.

Story img Loader