‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण शहाण्या माणसाला लागू पडते मात्र पुढच्यास ठेच लागली असली तरी ती मला लागेल कशावरून, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देणे अवघड असते. त्यामुळे अशी मंडळी स्वतला ठेच लागल्याशिवाय, त्याची प्रत्यक्ष अनुभूती आल्याशिवाय विश्वास ठेवत नाहीत.
िपप्री चिंचवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे दुसऱ्या वर्गातील आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ते निवडून येताच त्यांच्या अंगात वारे शिरले. त्यातच त्यांचे तोंड सर्वाधिक सुटले होते. कानात वारे शिरल्यानंतर वासराची जी गत होते तशी त्यांची गत झाली व ऐनवेळी जे सुचेल ते, ते बोलत सुटले. आपल्या तोंडून गेलेल्या शब्दाला ब्रह्मवाक्याची प्रतिष्ठा आहे, असा त्यांचा स्वत:चा विश्वास असल्यामुळे आपण बोलतो तेच सत्य यावर तेच शिक्कामोर्तब करत सुटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर त्याच्या समर्थनासाठी त्यांनी स्वत:ची असली नसलेली बुद्धी पणाला लावली. आत्मीय भावनेपोटी आपण पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला. माझी आई, माझा शिवाजी यात जो आत्मीय भाव असतो तोच भाव पंतप्रधानांबाबतीत आपला होता. आपली कोणतीही चूक झालेली नाही त्यामुळे दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणे आपल्याला प्रसंगी मृत्यूही पत्करावा लागला तरी आपण आपल्या निर्णयावरून ढळणार नाही, माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही. आपण ग्रामीण भागातील असल्यामुळे आपली भाषा मोकळीढाकळी आहे. शब्दापेक्षा त्यातील भावना लक्षात घेतल्या पाहिजेत असे सांगत, ‘पडलो तरी नाक वर’ या तोऱ्यात ते बोलत राहिले.
आजपर्यंत अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वादात राहिले. अनेकांनी वाद ओढवून घेतला. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मराठीतील भाषेचा सर्वोच्च मान आहे. अशा मानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कोणत्या वेळी कोणता शब्द वापरावा याचे मूलभूत ज्ञान असू नये यापेक्षा मराठीचा मानभंग अधिक कोणता असू शकतो?
माझे सत्य हेच अंतिम आहे असा दावा करणाऱ्या सबनीसांनी ‘मी खेडूत असल्याने माझ्याकडून पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख झाला त्यामुळे मी शब्द मागे घेत आहे. त्याबद्दल मी अस्वस्थ, दु:खी अन् दिलगीर आहे’ असे मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सबनीस यांच्या सत्याने एकदम माघार का घेतली ? शहीद होण्यापर्यंत त्यांची मनस्थिती होती, त्यात कोणत्या कारणामुळे बदल झाला? आपले चुकले आहे याची उपरती होण्यासाठी त्यांना इतका काळ अधिक का लागला ? आपली ग्रामीण भाषा आहे व मोकळीढाकळी भाषा आहे त्यामुळे इतरांनी शब्दाकडे न पाहता त्यातील भावना समजून घ्याव्यात असे सांगणाऱ्या सबनीसांनी अचानकपणे मी खेडूत आहे, त्यामुळे एकेरी उल्लेख केला गेला असे सांगून आपण मराठवाडय़ातील खेडूतांचा अपमान करत आहोत याचे भान ठेवले नाही. खेडूत मंडळी अशिक्षित असली तरी ती असंस्कृत असत नाहीत. शहरी माणसांपेक्षा कितीतरी पटीने ती सुसंस्कृत असतात. त्यांना माफीच मागायची होती तर ‘मी मराठीत पीएच.डी. केली आहे. कोणता शब्द कुठे, कधी, केव्हा, कसा वापरावा याचे मला भान राहिले नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे मी स्वतलाच कुठे ठेवू अन् कुठे नाही या मनस्थितीत असल्यामुळे माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल मी माफी मागत आहे’ असे त्यांनी म्हणायला हवे होते.
त्यांनी माफी मागताना जी भाषा वापरली आहे त्यातून पुन्हा नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाचा भाषेचा वापर करण्यात इतका कच्चा अध्यक्ष यापूर्वी कधी झाला नसावा. त्यांनी आपल्या माफीनाम्यात पंतप्रधानांची माफी मागतानाच मराठी जाणणाऱ्या संपूर्ण जनतेची जाहीर माफी पुन्हा एकदा मागितली पाहिजे.
आपली भूमिका संवादाची आहे असे सांगणारे सबनीस संवादाला फाटा देत अतिशय अहंगंड पद्धतीने गेले काही दिवस वागत राहिले. माफी मागण्याचा शहाणपणा त्यांना उशिरा का होईना सुचला याबद्दल त्यांच्यातील शहाणेपणाचे अभिनंदन केले पाहिजे. यापुढील काळात ते आपल्यातील शहाणेपणाकडे आत्मभान ठेवून पाहतील व त्या दृष्टीनेच कृती करतील, अशी अपेक्षा तुर्तास करण्यास हरकत नसावी. अर्थात आपल्या आगामी काळातील वागण्यातूनच त्यांना आपण नेमके कसे आहोत, हे लोकांसमोर दाखवावे लागणार आहे.

Story img Loader