राज्यासह मराठवाडा विशेषत: लातूरमध्ये सलग दोन वर्षांपासून कोसळलेले दुष्काळी संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई या पाश्र्वभूमीवर यंदाचा ‘लातूर फेस्टिव्हल’ रद्द केल्याची माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिली.
‘द लातूर क्लब’च्या वतीने दरवर्षीच जानेवारी महिन्यात ‘लातूर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येते. लातूरकरांना यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळते. कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. यामुळे हा फेस्टिव्हल लातूरकरांना आनंद देणारा व त्यांच्या पसंतीस उतरलेला सोहळा आहे.
यंदा लातूर जिल्हय़ावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप आणि रब्बीही हातातून गेल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. त्यातच पाणीटंचाईचेही अभूतपूर्व संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत बळीराजाला आधार देण्याचा निर्णय ‘द लातूर क्लब’ने घेतला आहे.
लातूर क्लबचे सदस्य व लातूर  लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष धीरज देशमुख, लक्ष्मीकांत कर्वा, प्रसाद उदगीरकर, बाळकृष्ण धायगुडे, संजय अयाचित यांनी यंदा ‘लातूर फेस्टिव्हल’ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले.

Story img Loader