छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी परभणी, लातूर व नांदेड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. तर जालन्यामध्ये धुळे-सोलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंगोलीमध्ये जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र उपोषण सुरू केले. एका बाजूला मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलनाचा स्वर उंच होत असताना धनगर आरक्षण मागणीसाठी, बंजारा आरक्षणातील वर्ग बदलाच्या मागणीसाठीही मोर्चे काढण्यात आल्याने संभाजीनगर वगळता मराठवाड्यात सोमवारी आंदोलनांची राळ उडाली.

जालना येथे सुरू असलेल्या जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध जिल्ह्यांत बंद पुकारण्यात येत आहे. धाराशिव, बीडनंतर सोमवारी परभणीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नांदेड शहरातील श्रीनगर, जुना मोंढा, नवीन मोंढा, वजिराबाद आदी भागांतील दुकाने कडकडीत बंद होती. इतर ठिकाणी व्यवहार माफक प्रमाणात सुरू होते. दरम्यान खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी सुट्ट्या दिल्या होत्या. शाळेच्या बस, व्हॅन संघटनांनीही वाहने बंद ठेवली असल्याचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी सांगितले. भाग्यनगर परिसरात मराठा आंदोलकांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. छत्रपती चौकात दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत असताना पोलिसांनी दोन मराठा आंदोलकांना मारहाण केली. या मारहाणीनंतर मराठा आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. लातूर शहरातील शाळा, महाविद्यालयेही बंद होती. दुसरीकडे धनगर समाजाच्या वतीने आरक्षणातील श्रेणी अनुसूचित जमातीमध्ये करावी यासाठी शेळ्या-मेंढ्यासह काढलेल्या मोर्चामुळे लातूरमध्ये चार तास वाहतूक खोळंबली. बंजारा समाजाच्या वतीनेही आरक्षण मागणीसाठीचा मोर्चा काढण्यात आला. भूम, पैठण येथेही जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बंद पाळण्यात आला.

हेही वाचा >>>मराठवाड्यात भाजपने कंबर कसली, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक

जालन्यात उल मिलादुन्नबी निमित्त १९ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी काही दुकानांची तोडफोड झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी जालना शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. संघटनेने शहरात मोर्चाही काढण्यात आला. करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनास आणि मोर्चास मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. धनगर समाजाचा अनुसूचित प्रवर्गाच्या आरक्षणात समावेश करण्यासह इतर मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र धनगर समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील लांझी चौकात रोको आंदोलन केले. लातूरमध्ये रस्त्यावर शेळ्या- मेंढ्यासह मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. भूममध्येही धनगर समाजाने आंदोलन केले. परळी वैजनाथ येथे सोमवारी सोयाबीनला सात हजारांचा तर कापसाला दहा हजार रुपयांचा भाव मिळावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर, बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

संभाजीराजे छत्रपती जरांगेंच्या भेटीला

जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी भेट घेतली. या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. जरांगे यांच्या प्रकृतीविषयीही त्यांनी वैद्याकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.