लातूर पाणीपुरवठय़ाची योजना ठेकेदाराअभावी बासनात गुंडाळली असतानाच या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फतच पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त उमांकात दांगट यांनी दिले आहेत. टंचाई काळातील अन्य चार पर्यायांवरही सोमवारी आयोजित विशेष बठकीत चर्चा करण्यात आली. या शहराला महिनाभरातून एकदाच पाणीपुरवठा होतो.
मांजरा धरणावरील उच्च पातळी बंधाऱ्यात पाणी आलेच तर ते न अडविता प्राधान्याने लातूर शहर पाणीपुरवठय़ासाठी वापरावे, तसेच मांजरा धरणाच्या क्षेत्रात विहिरी घेण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. भंडारवाडीतून पाणीपुरवठा योजना सुरू राहिली असती, तर आणखी काही दिवस आणीबाणीची स्थिती पुढे ढकलता आली असती. मात्र, तसे झाले नाही. महापालिकेने काढलेल्या निविदांना तब्बल सात वेळा ठेकेदारांनी नकारघंटा वाजविल्याने ही योजना दोन वर्षांपासून रखडली. आता ती जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तातडीची गरज म्हणून उजनी जलाशयातून उस्मानाबादपर्यंत आलेली जलवाहिनी पुढे नेण्याच्या प्रस्तावावरही आता पुन्हा चर्चा केली जात आहे. उस्मानाबादसाठी दररोज १६ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची योजना मंजूर आहे. मात्र, या योजनेसाठी केवळ ८ एमएलडी पाणी उपसा करता येतील, अशीच मोटार बसविली आहे. त्यामुळे लातूरला पाणी द्यायचे असल्यास पंपसेट बदण्याची गरज भासणार आहे. त्याचा खर्च टंचाईतून केला जाऊ शकतो. ही जलवाहिनी टाकल्यास उस्मानाबादच्या पाण्याचा प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सुटू शकतो. आमदार राणा जगजितसिंह यांनीही तसे निवेदन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना दिले होते. त्यानंतर या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. शेवटचा पर्याय म्हणून रेल्वने पाणी आणण्याचा मार्गही खुला असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी सांगितले.
दरम्यान, लातूर महापालिकेने त्यांची अंतर्गत पाणी वितरण प्रणाली तातडीने सुधारावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागझरी येथून पाणी उपसा करण्यासाठी एक्सप्रेस फिडरची आवश्यकता आहे. त्याची सोय करण्याबाबतच्या सूचनाही महापालिकेस देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या जलस्रोतांतून पाणी मिळविता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात आली. सोमवारच्या बठकीनंतर अनेक उपाययोजना मार्गी लागतील, असा दावा आयुक्त दांगट यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा