औरंगाबाद : पारंपरिक पेहरावाला नावीन्यपूर्ण कल्पकतेची जोड देऊन नव्या कलाकृती निर्माण करण्याची कला साधली तर ती स्वत:सह इतर सहकाऱ्यांच्याही अर्थार्जनासाठीचे नवे दालन खुले करून देऊ शकते, याचे उदाहरण समोर ठेवले ते तांडय़ावरील एका अल्पशिक्षित महिलेने. यातून त्या महिलेचा प्रवास पार थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टनपर्यंत घडून गेला.

विमल धोंडीराम जाधव, असे या महिलेचे नाव. शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे. बीड जिल्ह्यातील वसंतनगर तांडा हे त्यांचे माहेर आणि सासरही. बाहेरच्या शहरांशी तसा फारसा संपर्क नव्हताच. डोंगरांच्या कुशीतील उंच-सखल माथ्यावरील भागातील शेतीवरच त्यांची उपजीविका. पण शेती तशी बेभरवशाची. त्यामुळे घरात आर्थिक चणचण कायम. अर्थार्जनाचे नवे पर्याय शोधण्याच्या प्रयत्नातून महिलांना बचतगट ही संकल्पना अधिक जवळची, वाटते. तशी विमलबाईंनीही ती जवळ केली. चार-चौघींनी मिळून बचतगट सुरू केला. उत्पादन म्हणून आपल्याच समाजातील स्त्री पोशाखाची निवड केली. हा पोशाख जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळीवरील महामेळाव्यात दालन लावून विक्रीसाठी ठेवला. फाइलसारख्या इतरही वस्तू बचतगटामार्फत तयार केल्या. या वस्तूंना मेळाव्यातील विक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहून विमलबाईंनी वसंतनगरसह इतरही तांडय़ावरील महिलांसाठी काम सुरू केले. आज एक हजार महिलांसाठी काम करतात, असे विमलबाई सांगतात.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय स्वयंसहायता बचतगट महामेळाव्यात विमलबाईंच्या रुक्मिणी स्वयंसहायता महिला बचतगटाला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. त्यापूर्वी मुंबईतही बंजारा स्त्री पोशाखाची व त्याच रंगसंगतीतीला नावीन्यपूर्ण कल्पकतेची जोड देत महिलांसाठीच्या पर्स, घागरा-ओढणी, पिशव्या असे विविध प्रकार तयार करण्यात आले. त्याला विक्रीतून चांगलाच प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने विमलबाईंच्या कलाकृतींमधील नावीन्यतेची दखल घेतली. त्या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जळगाव, वर्धा, नागपूर व बीडच्या बचतगटाच्या महिलांना अमेरिकेतील बाजारपेठेचा अभ्यास घडवून आणला. त्यात विमलबाईंही होत्या.

वसंतनगर ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवासाबाबत विमलबाई सांगतात, एके दिवशी अचानक मुंबईहून फोन आला तेव्हा ते काही खरे वाटले नाही. सारे स्वप्नवत. आजही तसेच वाटते. वसंतनगर ते न्यूयॉर्क, वॉिशग्टन असा प्रवास अलिकडेच घडला. तेथे सहा दिवस राहिलो. चित्रपट अभिनेते अनुपम खेरही सोबत होते. तेथे फेसबुक, गुगलच्या कार्यालयांना भेटी दिल्या. बरेच पाहता आणि शिकताही आले. बाजारपेठेचाही अंदाज आला. आयुष्यात कल्पनाही कधी केली नव्हती की विदेशातील अमेरिकेसारख्या मोठय़ा प्रगतशील देशात जाऊन येईल म्हणून. 

काय म्हणतात पोशाखातील कपडय़ांना

सर्वसामान्यपणे लेहंगा किंवा पेटीकोटसारखा आकार असतो त्याला फेटय़ा, चोळीला कातळी, डोक्यावरील भागाला पामडी, डोक्यावर ओढणी असते त्याला घुंगटी, कानाच्या जागी असतो त्याला चोटला किंवा अटी, गळ्याजवळील भागाला हासलो, तितरी, पशांच्या माळेला हार, असे म्हटले जाते.