छत्रपती संभाजीनगर – बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल आढळून आल्याच्या कारणावरून शेकडो विद्यार्थ्यांना औरंगाबाद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पाचारण केल्याने खळबळ उडाली आहे. पाचारण केलेले विद्यार्थी हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी व तेथीलच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे आहेत.
यातील काही विद्यार्थी व पालकांनी सांगितले की, अचानक बोर्डाचे महाविद्यालयाला पत्र आले. त्यात संबंधित विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल व शाईबदल दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित उत्तरपत्रिकेवरील बदल झालेले अक्षर त्यांचे नसल्याचे बोर्डाच्या अधिकार्यांना सांगितले.
हेही वाचा – बालन्यायनिधीचे वाटप संथगतीने, करोनातील एकल पालक मुलांसाठी मदत
बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तरपत्रिकेच्या तपासणीत काही विद्यार्थ्यांच्या लेखनात प्रश्नपत्रिकेशी संबंधित मजकुराऐवजी अन्य बाबी आढळून आल्या जसे की मोबाईल फोन नंबर वगैरे. शाईमध्येही फरक दिसून आला. अशा किंवा ज्यांच्यावर परीक्षेदरम्यान कॉपी आदी संबंधित कारवाई करण्यात येते अशांना मंडळाकडून पाचारण केले जाते व चौकशी केली जाते. पैकी वरील अक्षरबदलाशी संबंधित कारणांतर्गत विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले. त्यांचे लेखी म्हणणे बोर्ड घेत असते.