औरंगाबाद – दौलताबाद येथील दर्ग्याच्या देखभालीपोटी मिळणाऱ्या चिरागीच्‍या (दान) पैशांवरुन झालेल्या वादातून वृध्‍दाचा चाकू भोसकून खून करणाऱ्या पुतण्‍यासह त्‍याच्‍या मित्राला जन्‍मठेप आणि विविध कलमांखाली प्रत्‍येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस. एस. ओझा यांनी सोमवारी सुनावली. सैफोद्दीन उर्फ राजा नुरोद्दीन शेख (२०) आणि आसीफ सिध्दीकी कुरेशी (१९, दोघे रा. निजामोद्दीन रोड, शहागंज) अशी आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरणात मृत शेख युसूफोद्दीन शेख शमोद्दीन (७३) यांची पत्‍नी जुबेदा युसूफोद्दीन शेख (५५, रा. मोमीनपुरा, दौलताबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, त्‍यांचे कुटूंब वंशपंरपरागत दौलताबाद येथील एका दर्ग्याची देखभाल करतात. त्‍यापोटी त्‍यांना चिरागी देण्‍यात येते. या चिरागीवरुन आरोपी व फिर्यादीच्‍या कुटूंबामध्‍ये वाद सुरु होते. दरम्यान आरोपी सैफोद्दीन याच्‍या वडीलांचा खून झाला होता. मृत युसूफोद्दीन याच्‍यावर खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. मात्र न्‍यायालयाने खूनाच्‍या गुन्‍ह्यातून मृत युसूफोद्दीन यांची निर्दोष मुक्तता केली होती. याचा राग मनात असतांनाच चिरागी वरुन आरोपी हा मृताच्या कुटूंबाशी नेहमी वाद घालत होता. दरम्यान १३ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी चार वाजेच आरोपी सैफुद्दीन व त्‍याचा भाऊ अझरोद्दीन हे मृताच्या घरी गेले होते. त्‍यावेळी त्‍यांनी चिरागीच्‍या हिस्‍याबाबत वाद घातला असता, चिरागीचे प्रकरण न्‍यायालयात सुरु आहे, त्‍याचा जो निर्णय होईल त्‍या प्रमाणे वाटणी करु असे मृताने सांगितले. १४ फेबु्रवारी २०१७ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपी सैफोद्दीन व त्‍याचा मित्र आसीफ हे फिर्यादीच्‍या घरी गेले होते़, चिरागीच्‍या कारणावरुन वाद घालत सैफोद्दीन याने युसूफोद्दीन यांच्‍या बरगडीत भोसकला तर त्‍याच्‍या मीत्राने देखील युसूफोद्दीनवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. उपचार सुरु असतांना डॉक्टरांच्‍या समक्ष तपास अधिकाऱ्यांनी युसूफोद्दीन यांचा मृत्‍युपूर्व जबाब नोंदवला. उपचार सुरु असतांना त्‍यांचा मृत्‍यु झाला. प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी तत्कालीन उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.  सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात फिर्यादीसह जबाब घेणारे तपास अधिकारी आणि डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life imprisonment two in the case murder money chirag punishment ysh