लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याने व त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना पैठण तालुक्यातील कातेपूर शिवारात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मंगळवारी सकाळी दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पैठणच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मिळाली.
नवनाथ शामराव जगधने (वय ३०), शीतल दोडवे-उघडे (२८) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांनी आत्महत्या का केली, यासंदर्भात कारण अस्पष्ट असून, एमआयडीसी पोलिस माहिती घेत आहेत.
मृत नवनाथ श्यामराव जगधने याच्यावर अंबड (जि. जालना) येथील पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी तो कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र एक महिन्याच्या पॅरोलवर सुटीत आला होता. परंतु पॅरोलची सुटी संपल्यानंतरही तो मुदतीत कारागृहात हजर झाला नव्हता. दरम्यान एमआयडीसी पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ जगधनेने २८ मार्च रोजी सायंकाळी विहिरीत उडी मारण्यासाठी गेले असता नातेवाइकांनी समजूत घालून घरी परत आणले होते.
३० रोजी घराच्या गच्चीवर झोपला असता नवनाथ विषारी औषध प्राशन करून घरातून निघून गेला. गावाजवळील मक्याच्या शेतात सोमवारी नवनाथसोबतच शीतलचाही मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे, बीट जमादार गणेश खंडागळे,पोना रहटवाडकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.
प्रेम प्रकरणातून मुलांचा खून
शीतलचे लग्न दुसरीकडे झाले असताना कातपूर येथील नवनाथवर तिचे प्रेम होते. नवनाथ तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला असताना तिच्या ६ वर्षीय मुलाचा खून त्याने केला होता. त्याच प्रकरणी तो शिक्षा भोगत होता. तर शीतलला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथे भाड्याने राहत होते. काही दिवसांपूर्वी ते कातपूर येथे आले होते.