विशेष प्रतिनिधी लोकसत्ता
छत्रपती संभाजीनगर : महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी दाखल केलेल्या त्यांच्या दुसऱ्या शपथपत्रात पत्नीच्या नावे जालना व जळगाव येथे देशी व विदेशी मद्यविक्रीचे परवाने असल्याची नवीन माहिती शपथपत्रात दिली आहे. स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत शेती, मानधन आणि भाडे असे दर्शविले असून पत्नीच्या उत्पन्नाचे स्रोत शेती आणि मद्यविक्री व्यवसाय असा नमूद करण्यात आला आहे. दुसऱ्या शपथपत्रातील या माहितीमुळे मद्य परवान्यांच्या चर्चेला राजकीय पटलावर नवीन फोडणी मिळाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच दिवशी संदीपान भुमरे यांनी एक अर्ज दाखल केला होता. त्यासोबत दिलेल्या शपथपत्रात मद्यविक्री परवान्याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती. नव्याने दिलेल्या शपथपत्रात जालना येथे एफ.एल.(फॉरेन लिकर ७) नंतर फॉरेन लिकर, कंट्री लिकर-३ हे परवाने जालन्यासाठी तर जळगावसाठीही याच पद्धतीचे दोन परवाने पत्नीच्या नावावर असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांचा रंग बदलण्याचा वेग सरडय़ापेक्षाही जास्त
सतत भूमिका बदलणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा रंग बदलण्याचा वेग सरडय़ापेक्षाही जास्त असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधी हे कसे अयोग्य उमेदवार आहेत, अशा आशयाची एक ध्वनिफीत ऐकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ किती लवकर बदलतात. सरडासुद्ध एवढय़ा लवकर रंग बदलत नाही.’ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची करत मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हेच विजयी होतील असा दावा केला. या मतदारसंघात कन्नड वगळता अन्य सर्वत्र महायुतीचे आमदार आहेत. कन्नडमध्येही आपली यंत्रणा उभी करा, असे आदेश त्यांनी दिले.