लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरडी जागीच ठार झाल्याची घटना २८ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वळण (ता.वैजापूर) येथे घडली. ऋतुजा सचिन कर्डक (रा. तांदुळवाडी ता. गंगापूर), असे हल्ल्यात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

ऋतुजा ही आपल्या आजोळी किरण सोनवणे यांच्याकडे आली होती. दरम्यान सायंकाळी ऋतुजा गट.न. ७७ मधील शेतातील अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला व जखमी केले. मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर कुटुंबियातील सदस्यांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला. जखमी अवस्थेतील ऋतुजाला कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावल्याची ही तिसरी घटना असून या घटनेमुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंगरथडी भागात बिबट्याची दहशत कायम, हल्ल्यांची मालिका थांबता थांबेना.