प्रतिदिन १० ते १२ टक्क्यांच्या व्याजदराच्या विळख्यात ग्रामस्थ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळंब तालुक्यातील मोहा हे ११ हजार लोकसंख्येचे गाव. दीड हजार उंबरा, त्यातील ३१५ कुटुंबे दारिद्रय़रेषेखालील. याच गावात बेकायदा सावकारी करणाऱ्या पप्पू चंदर मडके याने २१ वर्षांच्या अनिल मुटकुळे या तरुणाला व्याजाची रक्कम दिली नाही म्हणून गटारीचे पाणी पाजले. तो अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. या सावकाराच्या घरावर सरकारी यंत्रणेने मंगळवारी रात्री छापा टाकला आणि त्याच्या घरात व्याजाने दिलेल्या पैशाच्या दोन पिशव्या भरून चिठ्ठय़ा सापडल्या. या चिठ्ठय़ांमध्ये शेतकऱ्यांनी मकरसंक्रांतीसाठी, दवाखान्यासाठी, बियाणे विकत घेण्यासाठी प्रतिदिन १० ते १२ टक्के व्याजाने कर्ज घेतल्याची कागदपत्रे सहकार विभागातील अधिकाऱ्यांना आढळली. व्याजाचा दर पाहून यंत्रणाही चक्रावली.

पप्पू मडके यास १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अगदी किरकोळ खर्चासाठीसुद्धा हा सावकार व्याजाने पैसे द्यायचा. व्याजदर मात्र भरमसाट असे. १०० रुपये आज घेतले, तर २०० रुपये उद्या परत करायचे आणि ५०० रुपये घेतले तर हजार. गेल्या तीन वर्षांतील दुष्काळामुळे शेतकरी एवढा कंगाल झाला होता, की त्यांनी मकरसंक्रांतीच्या सणासाठी अगदी १०० ते ५०० रुपयांपर्यंतच्या रकमांसाठी सावकाराचे दार गाठले होते. सावकार पप्पू मडके याचा मोहा गावात मोठा बंगला आहे. त्याच्या घरझडतीत ४ जमिनींचे खरेदीखत, ४ गाडय़ांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि तब्बल दोन पिशव्या कोणाला व्याजाने पैसे दिले, किती दिले आणि कोणत्या व्याजदराने दिले, याची माहिती दर्शविणाऱ्या चिठ्ठय़ा सापडल्या.

छापा टाकण्यासाठी गेलेले सहायक निबंधक सी. पी. बनसोडे म्हणाले, अलीकडे सावकाराच्या घरावर छापा टाकण्याचे प्रसंग बऱ्याचदा आले. मात्र, एवढा मोठा व्याजदर आकारला गेल्याचे कधीच कागदपत्रांमध्ये पाहायला मिळाला नाही. मिळालेल्या चिठ्ठय़ा एका मोठय़ा कार्डशीटवर सरकारी यंत्रणेने  चिकटवल्या. एका कार्डशीटवरील कर्जाचा व्यवहार २ लाख ८६ हजार रुपयांपर्यंत मोजण्यात आला आहे. असे २० कार्डशीट आतापर्यंत तयार केले आहेत. अन्य चिठ्ठय़ा चिकटविणे अजूनही बाकी आहे. एवढय़ा छोटय़ा गावात ७० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या सावकाराने दिले असल्याचा अंदाज आहे. लवकरच त्याचा अधिकृत आकडा जाहीर केला जाईल.

सावकारांची दहशतच 

सावकाराला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू, अशी भाषा सरकारकडून यापूर्वी वापरण्यात आली होती. युती सरकारने शेतकऱ्यांचे कर माफ व्हावे म्हणून साडेचारशे कोटी रुपये सावकारांना दिलेदेखील. मात्र, सावकार कसे त्रास देतात, हे या घटनेवरून दिसून येते.