१० डिसेंबरला सामना रंगणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या औरंगाबाद विभागीय प्राथमिक फेरीत मंगळवारी दुसऱ्या दिवशी सामाजिक, राजकीय विषयांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या एकांकिका पाहावयास मिळाल्या. मराठवाडा व अहमदनगरमधून आलेल्या एकांकिकांच्या या संघांकडून नेपथ्य, अभिनय, वेशभूषा, दिग्दर्शन, सर्वच अंगांनी प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आले. या सादर केलेल्या एकांकिकांमधून पाच संघांची निवड करण्यात आली. आता या पाच संघांचा सामना १० डिसेंबर रोजी दुपारी होणाऱ्या विभागीय फेरीत पाहायला मिळणार आहे. त्यातून एका संघाची निवड करण्यात येईल.

औरंगाबाद येथील तापडिया नाटय़ मंदिरात आयोजित लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेतील अंतिम पाच संघ निवडल्याची घोषणा परीक्षक सिनेअभिनेते, नाटय़ कलावंत गिरीश परदेशी व अनंत कान्हो यांनी केली. या प्रसंगी आयरिस प्रॉडक्शनचे क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर मनीष दळवी, आर्ट डिरेक्टर विनायक काटकर, लोकसत्ताचे मुख्य वितरण प्रमुख मुकुंद कानिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षक गिरीश परदेशी व अनंत कान्हो यांनी प्रत्येक संघाला अत्यंत आस्थेने आणि तेवढय़ाच तटस्थपणे मार्गदर्शन केले. अनेक गुणवंत कलाकारांच्या अभिनय, दिग्दर्शनाचे कौतुकही केले. नाटक जगत राहा, असा मोलाचा सल्ला अभिनेते गिरीश परदेशी यांनी दिला. तर नाटकातील नेपथ्य, अभिनयातील जमेच्या बाजूंची ओळख अनंत कान्हो यांनी संघप्रमुखांना करून दिली.

निवडलेल्या पाच एकांकिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाची रावबा गजमल लिखित व दिग्दर्शित ‘मादी’. विद्यापीठाचीच ‘दिखावा’, अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉलेजची कृष्णा वाळके लिखित व दिग्दर्शित ‘लाली’, औरंगाबादच्या सरस्वती भुवनची संतोष गायकवाड लिखित व दिग्दर्शित ‘च्युतिया साले’ व जालन्याच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे लेखक सुहास मुंडे व दिग्दर्शक सुनील मोहन गव्हाणे यांची ‘दान’.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टुर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका-२०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टीमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर म्हणून तर एबीपी माझा न्यूज पार्टनर आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika 2018