औरंगाबादमध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका’ची उत्साहात सुरुवात
हलकी पण बोचणारी थंडी. वेळ सकाळची. साधारण साडेनऊ-दहाची. स्थळ – औरंगाबादच्या हृदस्थ भागातील तापडिया नाटय़ मंदिर. तरुण नाटय़ कलावंतांची पावले सकाळपासूनच नाटय़ मंदिर परिसरात पडण्यास सुरुवात झालेली. कोणी प्रांगणातच संहितेतील संवादांचे पाठांतर करताना तर कोणी अभिनय, उत्कंठतेच्या भावमुद्रांचा चेहरा दिग्दर्शक, सहकारी कलावंतांना दाखवताना, अशा उत्साही वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या औरंगाबाद विभागीय प्राथमिक फेरीला सोमवारी येथे थाटात प्रारंभ झाला.
शहराच्या तापडिया नाटय़ मंदिरात सकाळी प्राथमिक फेरी सुरू झाली. मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी आयरिस प्रॉडक्शनचे क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर मनीष दळवी, आर्ट डिरेक्टर विनायक काटकर, लोकसत्ताचे मुख्य वितरण प्रमुख मुकुंद कानिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोमवारी पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या शाखेतील विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. रावबा गजमल लिखित व दिग्दर्शित ‘मादी’या एकांकिकेने स्पर्धेची सुरुवात झाली. प्रत्येक एकांकिकेचे सादरीकरण झाल्यानंतर परीक्षकांनी नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले. दुसरी एकांकिका ‘मॅट्रिक’ या नावाची होती. दुपारच्या सत्रात स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणारी ‘इनर वर्ल्ड’ व ‘दिखावा’ या एकांकिका सादर करण्यात आल्या.
उर्वरित सादरीकरण आज
लोकसत्ता लोकांकिकेच्या औरंगाबाद विभागीय प्राथमिक स्पर्धेसाठी अनेक संघांनी नावनोंदणी केली आहे. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागातील वेगवेगळ्या शाखांमधील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. उर्वरित मराठवाडय़ातील इतर जिल्ह्य़ांमधून नोंदणी केलेल्या महाविद्यालयांच्या संघांना मंगळवारी तापडिया नाटय़ मंदिरात सादरीकरण करता येणार आहे. विभागीय अंतिम फेरी १० डिसेंबर रोजी होणार आहे.
आम्हा कलावंतांना पंढरीप्रमाणे..
नाटय़ कलावंत हा वारक ऱ्यांप्रमाणे रंगमंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत असतो. रंगमंच ही आम्हा कलावंतांची पंढरीच असते. लोकसत्ता लोकांकिकेच्या माध्यमातून हा रंगमंच सादरीकरणासाठी आम्हा कलावंतांना लाभला आहे. नाटय़ चळवळीतील आम्हा कलावंतांसाठी लोकसत्ता लोकांकिका ही पंढरीपेक्षा कमी नाही, अशा शब्दांत अनेक नवोदित कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रायोजक : सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.