‘लोकसत्ता’च्या वतीने ‘वक्ता दहसहस्त्रेषु वक्तृत्व स्पध्रेला सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मुद्दा ठसविण्यासाठी कोणती उदाहरणे घ्यावीत, कोणत्या विषयावर बोलले म्हणजे परीक्षकांचे लक्ष वेधले जाईल याचा बारकाईने विचार करीत सहभागी स्पर्धकांनी पहिला दिवस गाजवला.
शहरातील देवगिरी महाविद्यालयात सकाळी १०.३० वाजता परीक्षक प्रा. हृषीकेश कांबळे, दीपक पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर स्पध्रेस सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षीपासून ‘लोकसत्ता’च्या वक्तृत्व स्पध्रेची विद्यार्थी वाट पाहत होते. जळगाव व मराठवाडय़ातील ७६ स्पर्धकांनी या वर्षी नावे नोंदवली. त्यामुळे ही स्पर्धा दोन दिवस घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीसाठी यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांनी स्पध्रेच्या अटी व नियमांची माहिती दिली.
राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यंगावर बोट ठेवत स्पर्धकांनी दिलेल्या वेळेत विषय मांडला. ‘जनता सहकारी बँक, पुणे’ व ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी मराठवाडय़ातील खेडेगावातूनही विद्यार्थी वेळेवर पोहोचले होते.
स्पध्रेस सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अर्थात आयसीडी यांचे सहकार्य लाभले. तसेच युनिक अॅकॅडमी आणि स्टडी सर्कल स्पध्रेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. स्पर्धा उद्याही (मंगळवार) सुरू राहणार आहे.
नाशिकमध्ये आज प्राथमिक फेरी
नाशिक : महाविद्यालयीन तरुणाईला विविध क्षेत्रांतील घडामोडींबाबत अभिव्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची नाशिक विभागीय प्राथमिक फेरी मंगळवारी होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष. नाशिक विभागीय फेरीत ६२ स्पर्धक आपले विचार मांडणार आहेत. ‘जनता सहकारी बँक पुणे’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या स्पर्धेची ही फेरी गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. स्मारकातील स्वागत आणि श्रावण या सभागृहात सकाळी दहा वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होईल. स्पध्रेस सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अर्थात आयसीडी यांचे सहकार्य लाभले. तसेच युनिक अॅकॅडमी आणि स्टडी सर्कल स्पध्रेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. नाशिक विभागाची विभागीय अंतिम फेरी २ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज स्मारकामध्येच होणार आहे. राज्यातील आठही विभागांतून निवडण्यात आलेल्या वक्त्यांची १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महाअंतिम फेरी रंगणार आहे.