दिग्दर्शनासह अभिनय, संगीत, प्रकाशयोजनेत सरस
औरंगाबाद : ग्रामीण व शहरी तरुणांच्या मनामध्ये चाललेला कोलाहल व्यक्त करणाऱ्या औरंगाबाद विभागातील ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाची ‘मादी’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. तर, अहमदनगरच्या न्यू आर्टस् कॉलेजची कृष्णा वाळके लिखित व दिग्दर्शित ‘लाली’ ही दुसरी, तर औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाची ‘च्युतीया साले’ ही तिसरी सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली. ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे व विजय पटवर्धन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सोमवारी सायंकाळी निकालाची घोषणा करताच विजेत्या संघाने आनंदोत्सव साजरा केला.
औरंगाबाद येथील तापडिया नाटय़ मंदिरात आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतील अंतिम पाच संघांचे सादरीकरण सोमवारी करण्यात आले. परीक्षकांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दिवसभर आपापले सादरीकरण सर्वोत्कृष्ट व्हावे म्हणून सर्व कलाकार झटत होते. प्रकाशयोजना, नेपथ्य आणि अभिनयाला साहाय्यभूत ठरणाऱ्या सर्व अंगांनी परिपूर्ण सादरीकरण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता. विभागीय अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरलेली ‘मादी’ ही एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे.
एकांकिकेतील सर्वोत्कृष्ट मानकरी
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- रावबा गजमल- ‘मादी’
* सर्वोत्कृष्ट लेखक- कृष्णा वाळके -‘लाली’
* सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- राजेश अगुंडे- ‘मादी’
* सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- पल्लवी कुलकर्णी- ‘मादी’
* सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- हृषीकेश हराळ -‘लाली’
* सर्वोत्कृष्ट संगीत- अनिल बडे- ‘मादी’
* सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- रामेश्वर देवरे -‘मादी’
‘आपल्या भोवतालचे प्रश्न, युवकांच्या मनातील कोलाहल मांडणाऱ्या संहिता ‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेत पाहावयास मिळाल्या, त्याचा आनंद झाला. आपले प्रश्न कलावंत म्हणून मांडत राहिलो तर गाव सुधारतो, भोवताल सुधारतो.’
-मिलिंद शिंदे (परीक्षक)
‘कलावंत माणसं जोडत असतो. ही जोडण्याची प्रक्रिया नाटकाच्या माध्यमातून सतत करावी लागते, कारण त्यातूनच एकसंध, संघटित देश उभा राहतो. इथे सादर झालेल्या एकांकिकांमध्ये यश आले नाही म्हणून कोणी हिरमुसून जाऊ नये. अधिक ताकदीने पुढचे प्रयोग करावेत. आपण हरलो म्हणून ते जिंकले अशी भावना मनात ठेवावी आणि अधिक जोमाने पुन्हा कामाला लागावे.’
– विजय पटवर्धन (परीक्षक)