मंत्रिपदासाठी लाचारी करण्यापेक्षा लायकी वाढवण्यावर आपण भर देणार आहोत. बारामतीचे भावी खासदार आपणच होणार असल्याचा दावा करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले.
जिल्हय़ातील दुष्काळ पाहणीसाठी जानकर रविवारी लातुरात आले होते. शासकीय विश्रामगृहात पत्रकार बैठकीत ते बोलत होते. जानकर म्हणाले, की मंत्रिपदासाठी पूर्वी विचार आणि भूमिका पाहिली जात असे. आता विधानसभेतील डोकी मोजली जातात. विधानसभेत आपला एकच आमदार आहे. त्यामुळे मंत्रिपद मागायचे तरी कसे, सरकारला आमची गरज वाटत नसल्यामुळे आमच्या बाबतीत सरकार विचार करीत नाही. आगामी निवडणुकीत आमच्या आमदारांची संख्या वाढेल. मी आमदार घडविणारा माणूस आहे. भीक म्हणून दिलेल्या मंत्रिपदाची आता आपल्याला गरजही नाही, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना केवळ पॅकेज देऊन व कर्जमाफी करून बँकांचे भले होते व शेतकरी कायम पंगू बनतात. शेतकऱ्यांना स्वावलंबी केले पाहिजे. मात्र, राज्य सरकारची इच्छाशक्ती नसल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले.