छत्रपती संभाजीनगर : बार्टी व सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी रीट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्या. मंगेश पाटील व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी राज्य शासन, महाज्योती व इतर मागास बहुजन मंत्रालयास नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
याचिकेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण (बार्टी) व छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सारथी) संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. साठी नोंदणी केलेल्या दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मिळते. त्यासंदर्भाने अध्यादेशही काढण्यात आलेला आहे. याच धर्तीवर महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण व संशोधन संस्थेतील (महाज्योती) विद्यार्थ्यांनाही अधिछात्रवृत्ती मिळावी, अशी वारंवार मागणी केली.
मागील तीन वर्षांपासून ही मागणी आहे. या संदर्भाने वारंवार निवेदन देणे, आंदोलने केली. दोन वेळा बेमुदत उपोषणही केले होते. परंतु या संशोधकांना न्याय मात्र मिळाला नाही. त्या नाराजीने जयश्री भावसार, बळीराम चव्हाण, रामेश्वर मुळे, विद्यानंद वाघ, ज्ञानेश्वर पवार, पंडित चव्हाण, बाळू चव्हाण, शिवाजी चव्हाण, निखिल वाघ व भाऊराव देवकाते आदी संशोधकांनी ॲड. महेश भोसले यांच्यामार्फत रीट दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी वरीलप्रमाणे नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी अपेक्षित आहे.