छत्रपती संभाजीनगर : केज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांना शनिवारी अंबाजोगाईत वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काळे फासून चाबकाने मारहाण केली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तायडे यांनी दिली. तर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल केली असून, वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे व इतर चार ते पाच जणांविरुद्ध दंगलीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे.
हेही वाचा : ‘तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन’, उद्धव ठाकरेंचे छत्रपती संभाजीनगरमध्ये भावनिक आवाहन
वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे हे उमेदवार सचिन चव्हाण यांना काळे फासत असताना व मारहाण करतानाची एक चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली. शैलेश कांबळे यांनी सचिन चव्हाण यांनी भाजपच्या एका स्थानिक नेत्याकडून पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप करून निवडणुकीसाठी पैसे घेणे हा पक्षाचा आणि पक्षाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा अपमान असल्याचे माध्यमांना सांगितले. आपण काळे फासून सचिन चव्हाण यांना मारहाण केली असून तो गुन्हा आपल्याला कबूल आहे. दोन दिवसांपूर्वी सचिन चव्हाण यांची स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर पाच लाखांचा व्यवहार झाल्याची खात्रीपूर्वक माहिती कळली. त्यानंतरच काळे फासण्यात आल्याचे कांबळे म्हणाले. स्वत: सचिन चव्हाण यांनीही एका चित्रफितीत वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांसमोरच आपल्याला पैशांची गरज होती, त्यामुळे आपण काही मित्रांकडे रक्कमेची मागणी केल्याचे सांगताना दोघांकडून प्रत्येकी ५० हजार घेतल्याची कबुली दिली. शैलेश कांबळे माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की, सचिन चव्हाण यांना सुरुवातीलाच निवडणुकीसाठी पैसे नसतील तर आपण जनतेतून पैसा उभा करू असे सांगितले होते. परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सचिन चव्हाण हे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वास घेत नाहीत, हे लक्षात येऊ लागले. त्यातून पाच लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली. चव्हाण यांनी वंचित आघाडीला प्रस्थापितांच्या दावणीला बांधले असल्याचा आरोप करत त्यांना काळे फासल्याचे कांबळे यांनी सांगितले.