छत्रपती संभाजीनगर : कोणावर बनावट कागदपत्रे तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तर कोणी साखर कारखाना विक्रीत नातेवाईकांना घुसवून स्वार्थ साधल्याचा ठपका. ‘साखरमाया ’ जमविणारी काही मंडळी अवैध गुंतवणुकीच्या आरोपांत अडकली, अडकवली गेली. त्यातून पक्षांतरे झाली, सत्तेच्या बाजूला वजन वाढले आणि यंत्रणांच्या कारवाईचा भार घटला. मात्र, गेल्या पाच वर्षांत या मंडळींच्या मालमत्तेत घसघशीत वाढ झाली आहे.

राजकीय नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे आरोप नेहमीच होत असले तरी, २०१९ नंतर राज्याच्या (पान ८ वर) (पान १ वरून) राजकारणात अशा आरोपांनी आणि त्यांच्याशी संबंधित कारवायांनी कळस गाठला. सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय, पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, प्राप्तिकर विभाग अशा विविध यंत्रणांकडून अनेक प्रकरणे दाखल केली गेली. अनेक प्रकरणांत छापे किंवा चौकशीची कार्यवाहीदेखील करण्यात आली. काही नेत्यांना तुरुंगवारी करावी लागली. त्यात मंत्रिपदावर असताना कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांचही समावेश आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यात संसदेत दिलेल्या माहितीनुसार २०१९पासून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी १३२ लोकप्रतिनिधींवर ‘पीएमएलए’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची संख्या ४३ इतकी आहे. त्यातील २६ लोकप्रतिनिधींवर गेल्या दोन वर्षांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा :नियुक्ती प्रक्रियेत अधिकार नसताना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, आरोग्य विभागातील ६०० नियुक्त्यांना स्थगिती; मॅटच्या प्राधिकरणाचे ताशेरे

गेली पाच वर्षे सुरू असलेल्या या कारवायांच्या धडाक्यात राज्यातील बड्या नेतेमंडळींचीही नावे आली. मात्र, यातील बहुतांश जणांनी ‘सत्ता’श्रय घेताच त्यांच्यावरील कारवाई थंडावल्याचेही दिसून आले. आता यातील काही प्रमुख नेते विधानसभेच्या रिंगणात असून त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या मालमत्तेत मोठी भर पडल्याचेही दिसून येत आहे.

प्रताप सरनाईक (शिवसेना ओवळा माजिवडा)

‘एनएसईएल’शी संबंधित ५६०० कोटींच्या गैरव्यवहारात आरोपी कंपनीकडून पैसे सरनाईक यांच्याशी संबंधित कंपनीत गुंतवण्यात आल्याचा आरोप. ईडीकडून ११.३५ कोटींची मालमत्ता जप्त.

मालमत्ता : गेल्या पाच वर्षांत संपत्तीत २४७ कोटी ६० लाख २३ हजार ६१९ रुपयांची वाढ. स्थावर व जंगम मालमत्तेचे बाजारमूल्य ३९१ कोटी रुपये ५० लाख ४२ हजार रुपये. स्वत: कडे २५ तोळे सोने, पत्नीच्या नावे ३३५ तोळे सोने पाच किलो चांदींचे भांडे आणि हिऱ्याचे दागिने.

हेही वाचा : मराठवाड्यातील उमेदवार वादाच्या रिंगणात

छगन भुजबळ(राष्ट्रवादी काँग्रेस येवला)

२०१६ पूर्वी मंत्री असताना सरकारी निविदांमध्ये आपल्या नातेवाईकांच्या आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नावे अपसंपदा गोळा केल्याचा आरोप. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच सक्त वसुली संचालनालयाकडून १५६ कोटींची संपत्ती जप्त. शपथपत्रात आरोपपत्राचा उल्लेख नाही.

मालमत्ता : पाच वर्षांत संपत्तीत तीन कोटी ७० लाख रुपयांची वाढ. भुजबळ दाम्पत्याची एकत्रित संपत्ती ३१ कोटी ४३ लाख. यात ५८५ ग्रॅम सोने, पाच किलो चांदीचा समावेश.

हेही वाचा :धाराशिव: विधानसभा निवडणूक २८ दिवसांवर, निवडणूक उपजिल्हाधिकारी फरार

अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस बारामती)

राज्य शिखर बँकेने नियमबाह्य कर्ज वाटप केल्याच्या आरोपांसह जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीप्रक्रियेतील गैरव्यवहाराप्रकरणी आरोप. एका प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून निर्दोषत्व. जरंडेश्वर कारखान्याची ६५ कोटींची मालमत्ता जप्त.

मालमत्ता : गेल्या पाच वर्षांत २० कोटी चार लाख ५९ हजार ७१३ कोटी रुपयांची वाढ. पतीपत्नीची एकत्रित संपत्ती ९५ कोटी ५३ लाख १० हजार ७८० रुपये. त्यात एक किलो सोने, ३५ किलो चांदीची भांडी, २० किलो चांदीच्या भेटवस्तू आणि २१ किलो चांदीच्या मूर्तींचा समावेश.