अवजार खरेदीची पाच हजार रुपयांची योजना तेजीत

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

राज्यातील सुमारे साडेतीन लाखांहून अधिक बांधकाम मजुरांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा झाले आहेत. या रकमेतून त्यांनी बांधकामासाठी लागणारे कुदळ, फावडे, टोपले अशी अवजारे खरेदी करावीत, असे अपेक्षित आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात नोंदणीकृत ७२ हजार ३४४ मजुरांपैकी २६ हजार ६५७ मजुरांना अनुदान मंजूर केले आहेत. राज्यात नोंदणीकृत १४ लाख कामगारांपैकी नऊ लाख आठ हजार कामगारांना या रकमेचा लाभ देता येऊ शकतो. डिसेंबर अखेपर्यंत दोन लाख ६९ हजार कामगारांना १३४ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. अनुदानाचा वेग जानेवारी, फेब्रुवारीत वाढविण्यात आला. विशेषत: मराठवाडय़ातील औसा, निलंगा या भागात तो अधिक होता. साडेतीन ते चार लाख कामगारांना रक्कम देण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रात अजूनही मंदीचे सावट आहे. फावडे आणि कुदळ विक्रेत्यांच्या दुकानात अक्षरश: शुकशुकाट आहे. पाच हजार रुपयांची अवजारांची योजना मात्र तेजीत आहे.

या वर्षी पहिल्यांदाच कामगारांच्या खात्यात थेट पाच हजार रुपयांची रक्कम जमा होत आहे. तसा संदेश कामगारांच्या मोबाइलवर जातो आणि ही रक्कम उचलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होते. आचारसंहितेपूर्वी बँकांमध्ये रक्कम उचलण्यासाठी मोठी गर्दी होत असे. एकाच वेळी २००-२०० मजूर रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसत असे. कामगार मंडळाचा कारभार राज्याच्या कामगार विभागामार्फत सुरू आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर या मंडळाचा कारभार तूर्त थांबविण्यात आले असल्याचे फलक कामगार कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहेत.

१९९६ मध्ये मंडळामार्फत कल्याणकारी योजना राबविण्यासाठी निधीचा वाटा ठरवण्यात आला. बांधकाम व्यावसायिक आणि राज्यातील विविध सरकारी योजनांमधील बांधकामाच्या हिश्श्यातील ठरावीक रक्कम मंडळाकडे हस्तांतरित केली जाते. त्यातून कामगार हिताच्या योजना राबवाव्यात, असे अपेक्षित होते. २०११ साली बांधकाम व्यावसायिकांना अवजार खरेदीसाठी रक्कम देण्याची योजना सुरू करण्यात आली. तेव्हा प्रत्येक नोंदणीकृत मजुराला तीन हजार रुपये दिले जायचे. आता ही रक्कम पाच हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. विशेषत: मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांमध्ये ‘मोदींनी पाठविलेली रक्कम’ असा प्रचार केला जात आहे.

औरंगाबादसारख्या मोठय़ा जिल्ह्य़ात २६ हजार ६५७ मजुरांना १३ कोटी ३२ लाख ८५ हजार एवढी रक्कम वितरित करण्यात आली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रक्कम वितरित केल्यानंतर कुदळ, फावडे विकणाऱ्यांच्या दुकानात मोठी गर्दी व्हायला हवी. शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यास लागून असणाऱ्या हार्डवेअर दुकानांमध्ये चौकशी केली असता गेल्या काही महिन्यांत अवजार खरेदी-विक्रीत अजिबात फरक पडलेला नाही, साधारणत: चांगल्या दर्जाची कुदळ ४०० रुपयाला येते आणि ३०० रुपयांपर्यंत फावडे येतात. हजार रुपयांमध्ये एका मजुराला लागणारे साहित्य सहज मिळू शकते, असे या विक्रेत्यांनी सांगितले.

अवजारांची रक्कम वाढवून दिल्यानंतर दरवर्षी निवडणुकांपूर्वी बांधकाम मजुरांना ही रक्कम दिली जाते. आघाडी सरकारच्या काळात कामगारमंत्री हसन मुश्रीफ असतानाही योजनेचा लाभ निवडणुकीपूर्वीच दिला होता. आता रक्कम वाढवून आणि व्याप्ती वाढवून रक्कम दिली जात आहे, असे या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांनी सांगितले.

‘मोदींनी पाठविलेले पैसे’

२०११ मध्ये बांधकाम व्यावसायिकांना अवजार खरेदीसाठी रक्कम देण्याची योजना सुरू करण्यात आली. तेव्हा प्रत्येक नोंदणीकृत मजुराला तीन हजार रुपये दिले जायचे. आता ही रक्कम पाच हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. विशेषत: मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांमध्ये ‘मोदींनी पाठविलेली रक्कम’ असा प्रचार केला जात आहे.