लातूर : रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक बाजारपेठेत सुरू झाली आणि दर हमीभावापेक्षाही पुन्हा घसरले. हरभऱ्याचा यावर्षीचा हमीभाव आहे ५ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल तर बाजारपेठेत ५ हजार ३०० ते ५ हजार ४०० असा भाव आहे. केवळ हरभराच नव्हे तर सोयाबीन, तूर, कापूस असे सारेच दर घसरले असून, ते हमीभावापेक्षा कमी आहेत.

लातूर बाजारपेठेमध्ये गुरुवारी दहा हजार क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. हमीभावाने खरेदी करण्याचे केंद्र सुरू होण्याची शक्यता धूसर असल्यामुळे शेतकरी आहे त्या किंमतीमध्ये माल विकण्याच्या मनस्थितीत आहे. पुन्हा भाव आवक वाढले की पडतील अशीही शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. सोयाबीन व तुरीची पुरेशी खरेदी शासनाच्या वतीने करण्यात आली नाही. आता हरभऱ्याची खरेदी कधी सुरू होणार, याबद्दल कोणी काही सांगत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

शेतीच्या वाणाला हमीभाव मिळत नाही व सरकार आयातीच्या पायघड्या कायम अंथरून बसलेले आहे. ऑस्ट्रेलियातून आत्तापर्यंत दहा लाख टन हरभऱ्याची आवक झाली असून, वाटाण्याची आवकही वीस लाख टन इतकी झाली आहे. ३७०० प्रतिक्विंटलने वाटाणा येतो आहे. त्यामुळे हरभऱ्याचे भाव बाजारपेठेमध्ये पडलेले आहेत.

हरभरा खरेदी केंद्र सुरू होण्याची गरज

हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा सरकारने केली तर त्याचा परिणाम बाजारपेठेतील भावावरती होतो. सध्या हमीभावापेक्षा तीनशे रुपयांनी भाव कमी आहेत. सरकारने खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली तरी भाव स्थिर राहू शकतात.
नितीन कलंत्री

डाळ उद्योजक, लातूर</strong>

Story img Loader