छत्रपती संभाजीनगर : आक्रमक भाषणातून ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी मांडणी करणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा नको असा सूर असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांना मात्र राज्यात भरपूर मागणी होती. गडकरी भाषणातून विकासाच्या मुद्द्यांवर बोलत असल्याने आणि त्यांनी केलेली रस्त्यांची कामे दिसत असल्याने त्यांच्याकडे कल होता. त्यामुळे योगींच्या सभा लादलेल्या आणि गडकरींच्या सभा मागितलेल्या असा प्रचाररंग दिसून आला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या आमदारांनी अनेक वर्षे मुस्लीम व दलित समाज जोडून ठेवला होता. ‘कटेंगे तो बटेंगे’ ही घोषणा या नेत्यांसाठी फारसा उपयोगी नव्हता. मात्र, गडकरी आले तर त्याचा फायदा होईल. भाजपचा ज्येष्ठ नेता मतदारसंघात आल्याचे चित्रही निर्माण होईल आणि प्रचाराच्या शेवटच्या काळात विकासाचा मुद्दा पुढे नेता येईल, अशी या नेत्यांची भावना होती. मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या सभांची मागणी केली होती. त्यांनीही लातूर, नांदेडसह मराठवाड्यात प्रचार केला. राणा जगजीतसिंह पाटील यांनी तर गडकरी यांची सभा आवर्जून मागून घेतली होती. गडकरी यांनी ७५ हून अधिक सभा घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५०-५२ ठिकाणी त्यांनी सभा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.