छत्रपती संभाजीनगर : गंगापूर विधानसभा मतदारसंघांचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे हे अज्ञातांकडून झालेल्या दगडफेकीत जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील लांजी गावाजवळ घडली, अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश सोनवणे यांच्या डोक्याला मार लागलेला आहे. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली असून त्यांची परिस्थिती चांगली आहे. घटनेनंतर पोलीस उपायुक्त बगाटे, छावणीचे सहायक पोलीस आयुक्त व एम वाळूज हे घटनास्थळी पोहचून जखमीची विचारपूस केली.
हेही वाचा : योगींच्या सभा लादलेल्या, गडकरींच्या मागितलेल्या!
पोलिसांनी तात्काळ ३ पथक आरोपीला शोध घेण्यास रवाना केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वाळूज पोलीस ठाण्यात येथे सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. दरम्यान, शहर पोलीस दलात पोलीस आयुक्त प्रवीण पवार स्वतः तसेच सर्व उपायुक्त, सहायक उपायुक्त, पोलीस निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांकडून गस्त सुरू आहे, कुणीही अफ़वावर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये. परिस्थिती शांत आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांचे चालक सूरज ज्ञानेश्वर मुंडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.