समृद्ध जीवनच्या मोतेवारला पुण्यात पकडल्याची बातमी पसरताच उस्मानाबाद जिल्हय़ात फसवणूक झालेल्या अनेक गुंतवणूकदार, एजंट, फिल्ड ऑफिसर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मोतेवारवर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून ३५ लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी २०१२ मध्ये उमरगा न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंद होता. पोलिसांनी न्यायालयात २०१३ साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवारला फरारी घोषित केले. मात्र, महेश मोतेवारला फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस आजपर्यंत अटक करू शकले नव्हते. गृह राज्यमंत्री प्रा. राम िशदे हे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी मोतेवारला केव्हा अटक होणार, अशी विचारणा केली होती. त्यानंतर गृह राज्यमंत्री िशदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आदेशित करून मोतेवारला तत्काळ अटक करण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर सोमवारी मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यात पकडल्याची बातमी पसरताच समृध्द जीवनमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे जीवन उद्ध्वस्त झालेल्या, त्याच्यामुळे गुंतवणूकदारांचा त्रास सहन करणाऱ्या एजंट व फील्ड ऑफिसर लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
चिटफंडद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सेबीने पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात मागील महिन्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महेश मोतेवारसह वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे याच्यासह समृध्द जीवन फूड्स कंपनीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कंपनीला सेबीने गुंतवणूक व ठेवी घेवू नये, अशी नोटीस बजावली असतानाही कंपनीने मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक व ठेवी जमा करून लोकांना गंडविले आहे. मंगळवारी मोतेवारला उमरगा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
येणेगूरचे प्रकरण भोवले
सांगलीचे तात्यासाहेब शिवगौंडा व शिवचंद्र रेवते यांच्या भागीदारीत उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे रेवते अॅग्रो कंपनी स्थापन केली होती. पुढे या भागीदारीत फूट पडली. त्यामुळे कंपनी वादात अडकली, अशा वादात रेवते यांनी तात्यासाहेब शिवगौंडा यांना फसवणूक करत ही कंपनी महेश मोतेवार यास ८५ लाखात विक्री केली. त्यामुळे शिवगौंडा यांनी रेवते यांच्यासह मोतेवार विरोधात उमरगा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. ३० फेब्रुवारी २०१० रोजी गुन्हा नोंदवला गेला, यात महेश मोतेवार सहआरोपी आहे. मात्र, या प्रकरणात महेश मोतेवार हजर झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी २०१३ मध्ये मोतेवार फरार घोषित केले होते.
त्रस्त गुंतवणूकदारांचा कार्यालयात गोंधळ
महेश मोतेवारची समृध्द जीवन कंपनी ही चिटफंड कंपनी असल्याचे जाहीर करून कंपनीची बँक खाती गोठविण्याचे आदेश सेबीने दिले होते. गुंतवलेले पसे परत मिळावेत म्हणून गुंतवणूकदार समृध्द जीवनच्या येथील कार्यालयात दररोज प्रचंड गर्दी करत आहेत. गोंडस योजना काढून मोतेवारच्या समृध्द जीवनने अनेकांना फसविले. मुदतीनंतरही गुंतवणूकदारांना पसे मिळाले नाहीत. स्थानिक मॅनेजर रजेवर आहेत, पुढील आठवडय़ात या असे सांगून कर्मचारी कंपनी कार्यालयाचा कारभार पाहात आहेत.
मोतेवार सापडला, पर्ल्सचे काय?
समृध्द जीवनच्या महेश मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी अटक केले. मात्र, समृध्द जीवनपेक्षा मोठय़ा प्रमाणात फास आवळणाऱ्या पर्ल्सचे घोडे कुठे आडले आहे, असा सवाल गुंतवणूकदार उपस्थित करीत आहेत. सर्वात मोठा म्हणजे तब्बल ६५ हजार कोटींचा घोटाळा पर्ल्सने केला आहे. १६ वर्षांपासून गुंतवणूकदारांकडून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक जमा करून घेतल्यानंतर मार्च २०१४ पासून रातोरात टाळे ठोकून पर्ल्सवाले गायब झाले आहेत. सीबीआयने पर्ल्स ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निर्मलसिंग भांगो यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पाच दिवस धाडी पडल्या. पंधरा दिवसांनी सेबीने पर्ल्सची मालमत्ता जप्त केली खरी, मात्र त्या जागेची मालकीच कंपनीकडे नाही. एकटय़ा उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचे तीनशे कोटींहून अधिक रुपये पर्ल्सने घशात घातले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा