चिटफंड घोटाळ्याप्रकरणी उस्मानाबाद पोलिसांच्या अटकेत असलेला समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार याचा ताबा मिळविण्यासाठी ओरिसा आणि मध्यप्रदेश पोलिसांचे पथक कामाला लागले आहे. ओरिसा पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांतील तपासासाठी मोतेवारचा ताबा मिळावा, यासाठी उमरगा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
महेश मोतेवार आणि समृध्द जीवन कंपनीने जिल्ह्यात किती जणांची फसवणूक केली, याचा उस्मानाबाद पोलीस कसून तपास करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याला अटक करून मंगळवारी उमरगा न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर ३१ डिसेंबपर्यंत मोतेवारची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उस्मानाबादबरोबरच महाराष्ट्रातील चाळीसगाव येथेही मोतेवारच्या विरोधात ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चाळीसगाव पोलिसांची टीम उस्मानाबादेत येण्यापूर्वी ओरिसा पोलिसांनी मोतेवारच्या ताब्यासाठी उस्मानाबादेत ठाण मांडले आहे.
मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथील थाटीपूर पोलीस ठाण्यात मोतेवारविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिटफंडशी संबंधित अधिनियमन कायद्यानुसार बारा लोकांनी मिळून त्याच्याविरूध्द तक्रार केली होती. त्याची माहिती देणाऱ्यास मध्यप्रदेश पोलिसांनी दोन हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. त्यांनाही मोतेवारचा ताबा हवा आहे. ओरिसा पोलिसांनी उमरगा न्यायालयात तसा रीतसर अर्ज दाखल केला आहे. त्याच्यावर आज निर्णय होण्याची शक्यता होण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेश आणि ओरिसा पोलिसांनी या प्रकरणाची तीव्रता ध्यानात घेऊन मोतेवारचा ताबा मिळावा, यासाठी वेगात हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात अन्य ठिकाणी गुन्हे दाखल असताना महाराष्ट्र पोलीस त्याकडे डोळेझाक करीत आहेत. ४७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना चाळीसगावचे पोलीस मात्र अद्याप उस्मानाबादकडे फिरकलेले नाहीत. उमरगा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर मुरूम पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या महेश मोतेवारला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी उस्मानाबादेत आणले आहे. गोपनीय पध्दतीने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोतेवारची तपासणी सध्या सुरू आहे. गुरुवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा