भगवानगड फक्त भाषणांपुरता आणि भांडणापुरता मर्यादित राहायला नको. त्याच एक स्वतंत्र अस्तित्व असून, तिथं फक्त भगवान बाबांचं नाव असावं. भगवान गड सुरक्षित रहायला हवा, यासाठी गडावरून कोणाचं राजकारण नको, असे मत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना व्यक्त केले. राजकारणाचे जुने अनुभव वाईट आहेत. त्याच दुःख मनात असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं शास्त्री म्हणाले. भगवान गडाची ३५० एकर जमीन आहे. त्याला धोका पोहोचू शकतो, असे वक्तव्य नामदेव शास्त्री करत असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या औरंगाबादमध्ये व्हायरल झालीये. त्या अनुषंगाने शास्त्री यांच्याशी संवाद साधला असता. त्यानी सविस्तर भूमिका मांडली.
तुमच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे, जमिनीचा काय मुद्दा आहे?
तुम्ही नीट समजून घ्या, औरंगाबादमध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था लोकशिक्षणासाठी भगवान बाबांनी उभारली होती. मिल कॉर्नर इथं संस्थेची जागा होती. अजब नगर इथं आजही दहा गुंठे जागा आहे. जिथं अनेक जणांनी शिक्षण घेतलं. त्या संस्थेची जागा भीमसिंग महाराज गादीवर असताना बळकावण्यात आली. आता भगवानगड सुरक्षित राहायला हवा, यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला गडावर प्रवेश नको, अशी भूमिका आम्ही घेतली. भक्तांसमोर मनातल्या भावना निघाल्या. काही चुकीचा शब्द गेला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा.
गोपीनाथ मुंडेंना गडावर प्रवेश होता, मग इतरांना का नाही ?
गोपीनाथ मुंडे यांची भाषणं ऐकली तर ते स्वतःला भगवान बाबांचा भक्त मानत होते. मात्र इतरांची तशी भाषा नाही. गडावर वारसा सांगितला जातो आहे. ही बाब योग्य नाही. मी गडाचा पहारेकरी आहे. त्यामुळे गडाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला. त्याचा फायदा देखील गडाला होतो आहे. वर्षभरात गडाचे भक्त वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ४० टक्के मराठा समाज गडाचा शिष्य आहे. ८२ पैकी ४० सप्ताह मराठा समाज बहुसंख्य असलेल्या गावात झाले. त्यामुळे एक धार्मिक भावना जपत गडाची वाटचाल झाली पाहिजे. भगवानबाबाच्या गादीचा विसर पडत कामा नये. आळंदी पैठण या सारख्या इतर धार्मिक स्थळांप्रमाणे भगवान गडाचे अस्तित्व असले पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
गडावर भाषणबंदीच्या निर्णयाबद्दल तुमची एकाधिकारशाही चालते?
भगवान गडाचा बहुसंख्य भक्त ऊसतोड कामगार आहे. हा वर्ग कागदोपत्री घोडे नाचवत नाही. जर निर्णय आवडला नसता, तर ‘शो’ दाखवला असता. एक वर्ष झालं गड शांत आहे. निर्णय मान्य नसता तर ती शांतता राहिली नसती. भक्त संख्या वर्षभरात ४० टक्के वाढली. मराठा समाज असलेल्या अनेक गावांत सप्ताह झाले. गडावर येणाऱ्या पायी दिंड्या ज्या बंद झाल्या होत्या. त्या पुन्हा सुरु झाल्या. भगवानगड भाषणापुरता आणि भांडणापुरता मर्यादित राहायला नको. त्याच एक स्वतंत्र अस्तित्व असून, तिथं फक्त भगवान बाबांचं नाव असावं. म्हणून तो निर्णय घेतला. जर निर्णय मान्य नसता तर हा बदल झाला नसता. झालेला बदल तुम्ही येऊन बघू शकता.
गडाच्याआडून राजकारण केलं जातंय, याचा रोख धनंजय मुंडे यांच्याकडे आहे ?
पंकजा मुंडे यांना गडावर भाषण करण्यास नाकारण्यात आले. धनंजय मुंडे यांना कसं भाषण करू दिले जाईल. आरोप प्रत्यारोप राजकारणाचा भाग आहे. माझे एवढंच सांगणे आहे, भाविकांच्या मताचे राजकारण करून मोठे होऊ नका. शिवाय गोपीनाथगड निर्माण करून गडाची वाटणी करून घेतली. आता हक्क राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.