पैशाअभावी मुलीच्या लग्नाच्या पाच दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये पित्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नारेगाव परिसरातील ब्रीजवाडी येथे राहणारे नागेश काशिनाथ आठवले (वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून १८ नोव्हेंबर रोजी नागेश आठवले यांच्या मुलीचे लग्न होते.
नागेश आठवले हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. नागेश आठवले यांच्या मोठ्या मुलीचे येत्या १८ नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. त्यासाठी आठवले कुटुंबीयांकडून लग्नाची तयारी सुरू होती. मुलीचे लग्न जवळ आले तरी पैशांची अडचण दूर होत नसल्याने नागेश आठवले गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते.
बुधवारी रात्री घरी कोणीही नसताना आठवले यांनी गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सिडको पोलिसांनी त्यांना घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.