मराठवाडय़ातील अपुरा पाऊस आणि खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेता जलसंधारणाच्या कामाची नितांत गरज आहे. पुढचे दशक जलसंधारण दशक म्हणून ओळखले जावे अशी कामे करावीत, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकारला केली. औरंगाबाद येथे इस्रायल तंत्रज्ञानचे सहकार्य घेऊन उभारलेल्या आंबा संशोधन केंद्राचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. २०१६ पर्यंत हे केंद्र पूर्णत्वाने सुरू होणार आहे.
एकूण अपुरा पाऊस आणि भूजल यावर उपाययोजना करताना फळबाग लागवड आवश्यक आहे. फळांचे उत्पादन, साठवणूक व वाहतुकीशी निगडित आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे राव यांनी सांगितले. शहरातील हिमायतबाग येथे केशर आंबा गुणवत्ता केंद्र उभारण्यात आले. या कार्यक्रमास इस्रायलचे कौन्सिल जनरल डेव्हिड अकोव्ह व कौन्सिलर डॅन अलुफ यांची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त कार्यालयात या अनुषंगाने घेतलेल्या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार योजना महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख करीत राज्यपाल राव म्हणाले की, जलसंधारणाची आवश्यकता आहेच, पण काळाच्या कसोटीवर टिकलेल्या पारंपरिक शहाणपणावर आधारित उपक्रम हाती घेतले जावेत. पुढील दशक या अनुषंगाने राज्य सरकारने काम करावे. पाण्याच्या प्रश्नामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी आता डाळिंबाकडे वळला असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी दिली. भारत-इस्रायल परस्पर सहकार्य वाढत असून औरंगाबाद येथील हे केंद्र आदर्श म्हणून विकसित होईल, असे डेव्हिड अकोव्ह म्हणाले. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला देता येऊ शकेल, असा प्रयोगही औरंगाबादेत हाती घेतला जाणार आहे. कार्यक्रमात फलोत्पादक शेतकरी भगवान डोंगरे व सूर्यभान कामटे यांनी अनुभव कथन केले. जिल्हाधिकारी निधी पांडेय व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत चौधरी उपस्थित होते.
राज्यपालांची सूचना पुढचे दशक जलसंधारणाचे!
पुढचे दशक जलसंधारण दशक म्हणून ओळखले जावे अशी कामे करावीत, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकारला केली.
Written by दया ठोंबरे
First published on: 22-09-2015 at 01:55 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango research center inauguration