छत्रपती संभाजीनगर : मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे भासविण्यासाठी ज्या महिलेचा वापर केला जाणार होता त्या कळंब येथील मनिषा बिडवे या महिलेची हत्या झाली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून आणि पैशाच्या वादातून झाली असल्याचा दावा धाराशिव पोलिसांनी केला आहे. दरम्यान अनैतिक संबंधाचा भास निर्माण करण्यासाठी या महिलेचा उपयोग केला जाणार होता का, यावर अद्याप तपास झालेला नाही, असे अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणाचा तपास नीट केला जावा यासाठी मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी कळंब पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट घेतली.

मनिषा बिडवे या महिलेच्या हत्या प्रकणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रामेश्वर भोसले व उस्मान गुलाब सय्यद अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी रामेश्वर भोसले याने बिडवे या महिला खून केल्यानंतर मृतदेहाजवळ त्याने जेवण केल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान धनंजय देशमुख यांचे अनैतिक संबंध आहेत, असे भासविण्यासाठी कोणत्या महिलेचा उपयोग केला जाणार होता, याचा नीट तपास करावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केला आहे. मृत महिलेचा अनैतिक संबंध संतोष देशमुख यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न होता, असा अरोप अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमातून केला होता. या प्रकरणात काही पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक माहिती लपवत असल्याचाही त्यांचा आरोप होता. दरम्यान मृत महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होता का, याचा तपास केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, मनिषा बिडवे हिचा वापर संतोष देशमुख हत्या प्रकरणात केला जाणार होता का, यावर बोलण्यास धाराशिव पोलिसांनी नकार दिला. तसा तपास अद्यापि झाला नसल्याचे सांगण्यात आले.