छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या गावोगावी गाठीभेटी घेण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी वाशी (जि. धाराशिव) येथून राज्याच्या विविध भागांमध्ये दौरा करण्यात येणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले. या दौऱ्याचे निमित्त करून कोणी पैसे मागत असेल तर त्याला ते देऊ नयेत, असे आवाहन करताना त्यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन हे पैसे कमावण्यासाठी नाही, हे स्पष्ट केले. २४ डिसेंबर रोजी सरकारला आरक्षणासाठी दिलेली जी मुदत आहे, त्या पार्श्वभूमीवर जागृती करण्यासाठी हा दौरा राहणार आहे.
हेही वाचा >>> आरक्षण मागणीच्या ध्रुवीकरणाचा मराठवाड्यात राजकीय लाभावरून तर्कवितर्क
गावागावांत कुणबी प्रमाणपत्र हाताने लिहून देणे सुरू असल्याचा आरोप काही नेत्यांकडून होत असल्याकडे लक्ष वेधले असता जरांगे यांनी पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले. मंत्री छगन भुजबळ यांना आमचे काहीच सहन होत नाही, कितीही समजूत सांगितले तरी त्यांचा विरोध कायम असल्याचा आरोप केला. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप होत असून आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे दृष्टिपथात असल्यामुळे समाजातील कोणीही आत्महत्या करू नये. समाज बांधवांनी परस्परांमध्ये मतभेद न होऊ देता एकजूट करून आरक्षणाचे आंदोलन बळकट करावे, असेही आवाहन त्यांनी केले.