सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला चप्पलचा हार घालून शाईफेक करत धमकीचा संदेश चिकटवण्यात आला होता. मराठ्यांना विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू असे या पत्रकात लिहीले होते. शनिवारी रात्री सांगलीत ही घटना घडली. या घटनेनंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. शेंडगे यांना केलीली शिवीगाळ ही मराठा तरुणांनी केली सिद्ध होत असून हा ओबीसींची मतं मिळवण्यासाठी केलेला स्टंट असू शकतो, असे ते म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

“शेंडगे यांच्याबरोबर घडलेला प्रकार मराठा तरुणांनी केला? हे कशावरून म्हणता येईल? ते मराठा समाजाचे तरुण होते, हे सिद्ध झालेले नाही. मुळात प्रत्येकाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. मात्र, कोणी ओबीसी आहे म्हणून विरोध करू नये, ओबीसी असो, दलित असो, मुस्लीम असो, लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. त्यामुळे असं कोणीही करू नये”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

हेही वाचा – “अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा…” भास्कर जाधव यांचा इशारा…

“ओबीसींची मते मिळवण्यासाठी केलेला स्टंट असू शकतो” :

“यापूर्वी काही ठिकाणी ओबीसींची मते मिळवण्यासाठी असे स्टंट झालेले आहेत. त्यामुळे हा देखील ओबीसींची मते मिळवण्यासाठी केलेला स्टंट असू शकतो. खरं तर मी राजकारण सक्रीय नाही. त्यामुळे या राजकीय प्रश्नांची उत्तरे देण्याचा अधिकार मला नाही. परंतु राज्याचा नागरिक म्हणून शेंडगेंबरोबर असं व्हायला नको. आमचं आणि त्यांचं शत्रुत्व नाही. त्यामुळे असे प्रकार समाजातील कोणीही करु नये”, असेही ते म्हणाले.

नेमकं काय घडलं?

सांगली लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांची गाडी हॉटेल समोर उभी असताना शनिवारी रात्री अज्ञातांकडून त्यांच्या गाडीच्या काचेवर धमकीवजा इशारा देणारा मजकूर असणारा कागद चिकटवण्यात आला होता. प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही भुजबळाने जशी नाशिकमधून माघार घेतली तशी तू घे, मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू एक मराठा लाख मराठा असे पत्रकात लिहीले होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil reaction on prakash shendge threatening message spb