मनोज जरांगे यांच्याकडे ८०० जणांचे अर्ज, निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात पुन्हा पक्षांतराच्या हालचाली

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते ते राजकीय पटलावर ताकद दाखविणाऱ्या मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे केले तर आपणही त्यात असावे असे वाटणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाने आंतरवाली सराटीमध्ये गर्दी झाली आहे.

Manoj Jarange Patil, applications from more than 800 aspirants, assembly elections 2024, marathwada
मनोज जरांगे यांच्याकडे ८०० जणांचे अर्ज ( संग्रहित छायाचित्र )

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘ताकदवान’ भाजपमध्ये राजकीय भवितव्य आहे, असे मानून प्रवेश घेणारी मंडळी आता पर्याय चुकला का, याची तपासणी करत आहेत. तर पक्षांतराच्या चाचपणीमध्ये आपण ‘शरद पवार’ यांचे नेतृत्व स्वीकारले तर कसे, याचीही चाचपणी करू लागले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते ते राजकीय पटलावर ताकद दाखविणाऱ्या मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे केले तर आपणही त्यात असावे असे वाटणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाने आंतरवाली सराटीमध्ये गर्दी झाली आहे. आतापर्यंत राज्यातून ८०० हून अधिक अर्ज आले असल्याचे जरांगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठवाड्यातून नऊ आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. यामध्ये मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, ज्ञानेश्वर चौगुले, बालाजी कल्याणकर, संतोष बांगर, प्रा. रमेश बोरनारे यांचा समावेश होता. या मतदारसंघात संघटना मजबूत करणे किंवा नवे उमेदवार ठरवणे उद्धव ठाकरे यांना आवश्यक आहे.

हे ही वाचा… Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

पैठणमध्ये राष्ट्रवादीतून दत्ता गोर्डे, पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांच्या विरोधात राजू शिंदे, वैजापूरमध्ये प्रा. बोरनारे यांच्या विरोधात दिनेश परदेशी आदींना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. या पूर्वी याच मतदारसंघातून भाऊसाहेब चिकटगावकर यांनी प्रवेश केला होता. परंतु परदेशी यांच्या प्रवेशानंतर त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. सिल्लोडमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांना नवा भिडू मिळवता आला नाही.

निवडणुकीच्या तोंडावर बीड, परभणी, धाराशिव, लातूर, जालना या मतदारसंघातून शरद पवार यांना भेटून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नांदेडमधील पक्षांतराचा खेळ काँग्रेस, भाजप आणि पुन्हा माघारी असा आहे.

हे ही वाचा… Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना आव्हान, “महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा..”

आरक्षण न देणाऱ्यांचा निर्णय आमच्या हाती : जरांगे

सत्ता असल्यामुळे आरक्षण देणे तुमच्या हातात होते. आता विधानसभेचे मतदान आमच्या हातात आहे. तुम्हाला सत्तेत येऊ द्यायचे की नाही, हे आमच्या हातात आहे, असा इशारा सत्ताधाऱ्यांना मनोज जरांगे यांनी मंगळवारी आंतरवाली सराटी येथे दिला. ते म्हणाले, की कोणतेही आंदोलन नसताना १५ जातींचा ओबीसींमध्ये समावेश केला. परंतु मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करायचा असेल तर महाविकास आघाडीकडून तसे लिहून घ्या. आता १५ जाती ओबीसींमध्ये घेतल्या तेव्हा फडणवीसांनी तसे लिहून घेतले का? आपण लोकसभेच्या वेळी जेवढी ताकद दाखविली होती, त्याच्या दुप्पट विधानसभेच्या निवडणुकीत दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil received applications from more than 800 aspirants for the assembly elections 2024 asj

First published on: 16-10-2024 at 13:31 IST

आजचा ई-पेपर : छत्रपती संभाजीनगर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या